आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत विक्रेत्यांचा प्रश्न गंभीर, अनधिकृत विक्रेत्यांची रेल्वेतील अधिकृत विक्रेत्यांवर दादागिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महिन्याचा रेल्वेचा दुसऱ्या दर्जाचा पास, तसेच रेल्वे पोलिस रेल्वेच्या अधिकाऱ्यांना ‘सांभाळण्याचे’ कौशल्य यांच्या जोरावर नगर ते दौंड ते मनमाड दरम्यान अनधिकृत खाद्यविक्रेत्यांनी रेल्वेची सेवा पूर्ण ताब्यात घेतल्याची स्थिती आहे. त्यामुळे रेल्वेतील स्टेशनवरील अधिकृत खाद्यविक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. अप्रमाणित आरोग्यास हानीकारक खाद्यपदार्थांमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनधिकृत विक्रेत्यांकडून रेल्वे प्रवाशांची मोठी लूट सुरू आहे. रेल्वेत असे अनधिकृत दर्जाहीन, शिळे महागडे खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्टेशनवरील अधिकृत विक्रेत्यांचेच नुकसान होत नाही, तर ज्या रेल्वेंना भोजनगृहाचा डबा (पँट्री कार) असतो, तेथील ठेकेदाराचेही आर्थिक नुकसान होत आहे. हप्तेखोरीमुळे अनधिकृत विक्रेते रेल्वेतील अधिकृत विक्रेत्यांवरही दादागिरी करत आहेत. रेल्वेच्या सर्व अधिकृत विक्रेत्यांना पाण्याची बाटली १५ रुपयांत देण्याचे बंधन आहे. अनधिकृत विक्रेते मात्र ती सर्रास २० रुपयांना विकत आहेत. सध्या उन्हाळ्यामुळे पाण्याच्या बाटल्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे प्रवाशांची लूट अनधिकृत विक्रेत्यांची अक्षरश: चांदी होत आहे.

प्रवाशांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी-सुविधा देण्याचा रेल्वे मंत्रालय प्रशासन कितीही दावा करीत असले, तरी सध्या नगरहून जाणाऱ्या सर्व रेल्वेंमध्ये अनधिकृत खाद्यविक्रेत्यांनी रेल्वेचे संबंधित अधिकारी रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादामुळे अक्षरश: कब्जा केला आहे. या विक्रेत्यांकडील खाद्यपदार्थांची कोणतीही तपासणी होत नाही. या विक्रेत्यांच्या मुक्त संचारामुळे प्रवाशांना जराही निवांतपणा लाभत नाही. दिवसभर त्यांचा रेल्वेच्या डब्यांतून आरडाओरड करत मुक्त संचार सुरू असतो.

हे सर्व विक्रेते थेट मनमाडपासून नगरपर्यंत बिनबोभाट कोणत्याही तिकिटाशिवाय किंवा पासशिवाय गाड्यांमध्ये मुक्त संचार करतात. काहींकडे महिन्याचे पासही आहेत. अनेकदा प्रवाशांना सामान घेऊन डबा बदलायचा असेल, तर या विक्रेत्यांचा मोठा अडथळा होतो. त्यांची वागणूकही अतिशय उर्मट त्रासदायक असताना रेल्वे पोलिस तिकीट तपासणीस त्यांना काहीही बोलत नाहीत. या विक्रेत्यांजवळच्या पाण्याच्या बाटल्याही अप्रमाणित असतात. त्यांच्याकडील पॅकबंद पदार्थही असेच प्रचलित नसलेल्या ब्रँडचे असतात.

भेळ, समोसे, वडे, इडली-सांबार, पोहे यांसारखेे तयार पदार्थ बेलापूर पढेगावसारख्या स्टेशनजवळच्या झोपडपट्टी वसाहतींत गलिच्छ वातावरणात तयार होतात. त्यांची साठवणूकही अतिशय अनारोग्यकारक वातावरणात केली जाते. अगदी हे पदार्थ रेल्वेतील स्वच्छतागृहाजवळ ठेवले जातात. प्लॅटफॉर्मवरही अत्यंत घाणेरड्या जागेत हे पदार्थ ठेवले जातात. हा सर्व प्रवाशांच्या जीवाशी खेळ अाहे, पण रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे फावत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. नगर ते मनमाड दरम्यान सर्व रेल्वेंमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी विक्रेते गाड्यांत घुसतात. त्यांच्याकडील पदार्थांची कोणतीच तपासणी होत नसल्याने त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह कायम आहे. या विक्रेत्यांची कोठेच नोंद नाही. त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसते. त्यांच्या पदार्थांचा दर्जा कधीही तपासला जात नाही. अधिकृत विक्रेत्यांना मात्र सर्व नियमांची बंधने आहेत. विभागीय व्यवस्थापकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या अनधिकृत विक्रेत्यांवर तात्पुरती बंदी येते. वरिष्ठ गेले की, यांचा धंदा पुन्हा जोरात सुरू होतो.

अनधिकृत धंदा
रेल्वेस्टेशनवरील काही विक्रेतेही यात उतरले आहेत. विशेष म्हणजे, ज्या विक्रेत्यांना त्यांच्या स्टॉलच्या बाहेर विक्रीसाठी अजिबात परवानगी नाही, त्यांनी यासाठी तरुणांच्या फौजा तैनातीस ठेवल्या आहेत. रेल्वेगाडी आली की, या विक्रेत्यांचा धुमाकूळ परिसरात सुरू होतो. अनेकदा त्यांच्या व्यावसायिक स्पर्धेतून वादही होतात, पण त्याकडे पोलिस दुर्लक्ष करत आहेत.

नफ्यापुढे सर्व क्षम्य...
सध्या रेल्वेत अनधिकृत विक्रेत्यांकडून भेळ, चहा, वडापाव, समोसे, मनुका, ईडली-चटणी आदी पदार्थांची विक्री होते. यात मिळणारा नफा इतका मोठा आहे, की अनेक विक्रेते स्टेशनपर्यंत आपल्या वातानुकूलित मोटारीतून येत असल्याची माहिती एका प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्याने दिली.

तिकिटाचे बंधन नाही
एरवी एखाद्या प्रवाशाकडे साधे तिकीट असल्यास तो स्लीपरच्या डब्यात चढल्यास त्याला डब्यातले तिकीट तपासनीस जबर दंड ठोठावतात. खाद्यविक्रेते मात्र थेट वातानुकूलित डब्यात मुक्त संचार करतात. हा संचार थेट तिकीट तपासनिसांच्या समोर सुरू असतो.मात्र, त्यांना कोणी साधे तिकीटही विचारत नाही.