आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Set Exam Give To Four Thousand Student At Ahmednagar

‘फिरोदिया’मध्ये गर्दी; चार हजार विद्यार्थ्यांनी दिली सेट परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पुणे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच ग्रामीण भागात घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत नगर केंद्रावर सुमारे 4 हजार 200 उमेदवारांनी आपले नशीब रविवारी आजमावले. न्यू आर्ट्स कॉलेज व भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल या दोन ठिकाणी झालेल्या या परीक्षेसाठी एकूण 201 ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण 309 कर्मचारी नेमण्यात आले होते, अशी माहिती परीक्षाप्रमुख प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी दिली.
न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये 133, तर फिरोदिया विद्यालयात 68 ब्लॉक होते. परीक्षेसाठी 201 पर्यवेक्षक, 100 शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे 1 निरीक्षक, 3 विद्यापीठ निरीक्षक व परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी विद्यापीठाचे 4 कर्मचारी नेमण्यात आले होते.
नगरसह बीड, नाशिक, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यांतील उमेदवार परीक्षेसाठी आले होते. उमेदवार वेळेवर परीक्षा केंद्रांवर आले, पण विविध विषयांच्या उमेदवारांची बैठक व्यवस्था एकाच वर्गात संमिर्श स्वरुपात करण्यात आल्याने काहीजण भांबावून गेले. सुरुवातीची काही मिनिटे विद्यार्थ्यांचा आसन शोधताना गोंधळ उडाला.
सकाळी 10 वाजता पहिला पेपर सुरू झाला. सव्वाअकरापर्यंत पहिला, सव्वाअकरा ते साडेबारा या वेळेत दुसरा आणि दुपारी दोन ते साडेचारपर्यंत तिसरा असे एकूण तीन पेपर झाले. एकूण 300 गुणांची परीक्षा होती. यंदा प्रथमच सविस्तरऐवजी बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. यापूर्वी सेट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पुणे किंवा अन्यत्र जावे लागत होते. यंदा मात्र नगर शहरामध्ये ही परीक्षा झाल्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. गेल्या आठ दिवसांपासून या परीक्षेची तयारी सुरू होती, असे प्राचार्य झावरे म्हणाले.
नगर जिल्ह्यातील विद्यार्थिनींना यापूर्वी सेट परीक्षेसाठी पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे जावे लागत असे. त्यात वेळ आणि पैसा अधिक खर्च होत असे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सेट परीक्षेचा फॉर्म भरण्याचे टाळत. यंदा नगरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील परीक्षार्थींची संख्या दुपटीने वाढली, असे प्राचार्य डॉ. झावरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
आधी गोंधळ..
आपल्याच शहरात परीक्षा असल्यामुळे आधी आनंद झाला. परंतु परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तो मावळला. आसन क्रमांक शोधताना गोंधळ उडाला. एकाच वर्गामध्ये विविध विषयांचे उमेदवार असल्यामुळे हा गोंधळ झाला. नंतर मात्र पर्यवेक्षक व निरीक्षकांनी सहकार्य केले.
- रुपाली मालकर, विद्यार्थिनी, नगर
वेळ व पैसा वाचला
यापूर्वी सेट परीक्षेसाठी पुण्याला जावे लागे. तेथे परीक्षा केंद्र व आसन क्रमांक शोधण्यात वेळ व पैसाही अधिक जायचा. नगरमध्ये केंद्र सुरु झाले, ही समाधानकारक बाब आहे. परीक्षा देताना ताण जाणवला नाही. आपल्याच शहरात परीक्षा देत असल्याने पेपरही छान गेले.
-प्रज्ञा हतवळणे, विद्यार्थिनी, नगर