आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेतूत होते एजंटांकडून विद्यार्थ्यांची लूट; सेतूतून मिळत नाहीत पण एजंट देतात पाचशे रुपयांत दाखले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सेतू कार्यालयातून विद्यार्थ्यांना तीन-तीन महिने दाखले मिळत नसताना एजंट मात्र पाचशे रुपयांत दाखला देण्याची हमी देऊन सर्वसामान्यांकडून पैसे उकळतात. दाखले देण्यासाठी एजंट खुलेआम पैशांची मागणी करत असताना तहसील प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मंगळवारी तहसीलदार कैलास पवार यांना घेराव घालून जाब विचारला.

सावेडीतील तहसील कार्यालयांतर्गत कंत्राटदारांच्या कर्मचार्‍यांमार्फत सेतूतून दाखल्यांचे वाटप केले जाते. दाखले मागण्यांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळत नाहीत. प्रशासनाच्या आशीर्वादामुळे सेतू कार्यालयात ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. त्याचा मोठा फटका विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागत आहे. शाळा व महाविद्यालयांचे प्रवेश सुरू झाल्याने विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी सेतू कार्यालयात मागील आठवड्यापासून विद्यार्थी व पालक गर्दी करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्यासाठी तीन महिने अगोदर अर्ज केले आहेत. मात्र, दाखल्यावर स्वाक्षर्‍या न झाल्याचे कारण पुढे करून सेतूतील कर्मचारी दाखले देत नाहीत. त्यामुळे तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात दाखले पडून आहेत.

एकीकडे तीन-तीन महिने दाखले मिळत नसताना दुसरीकडे एजंट मात्र पाचशे रुपयांत दाखला देण्याची हमी देताना दिसतात. सेतू कार्यालयातील एजंट खुलेआम विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक करत असताना प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले आहे. अनेक चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अर्ज केल्यानंतर महिन्याभरात दाखले देणे बंधनकारक आहे. मात्र, दाखल्यांवर संबंधितांच्या स्वाक्षर्‍या न झाल्याने तीन-तीन महिने दाखले मिळत नाहीत.
...तर गुन्हे दाखल करा
४सेतू कार्यालयातून विद्यार्थ्यांना वेळेवर दाखले मिळत नसतील, तर सेतू चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल. विद्यार्थी व पालकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दाखले उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. तशी सूचना संबंधितांना देण्यात आली आहे.’’
- कैलास पवार, तहसीलदार.
ठेकेदाराला प्रशासनाचा आशीर्वाद
तीन महिन्यांपासून लोकांनी दाखल्यांसाठी अर्ज केले आहेत. दररोज चकरा मारूनही दाखले दिले जात नाहीत. तहसीलच्या आशीर्वादामुळे ठेकेदार मनमानी करत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. प्रशासनाने दाखले उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा.’’
हरजितसिंग वधवा, उद्योजक.
पावती दिली, दाखला नाही
राष्ट्रीयत्वाच्या दाखल्यासाठी 30 मे रोजी अर्ज केला होता. 11 जूनला दाखला मिळेल, अशी पावती दिली होती. आठ दिवसांपासून सेतू कार्यालयात चकरा मारत आहे.’’
कैलास उशीर, नागरिक.
आज, उद्या असे करतात
४ 17 मे रोजी अर्ज केला होता. 2 जूनला दाखला मिळणार असल्याची पावती मिळाली. सेतूत दाखल्याची मागणी केली असता आज या, उद्या या असे सांगण्यात येते.’’
सुनील पवार, पालक.

मुंबईहून चार वेळा आलो
४ जातीचा दाखला हवा असल्याने 7 एप्रिलला अर्ज केला होता. तीन महिने उटलटूनदेखील दाखला मिळालेला नाही. दाखल्यासाठी मुंबईहून चार चकरा मारल्या.’’
विजय बोराटे, पालक.
‘त्यांच्या’कडेच पुन्हा सोपवली जबाबदारी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंधरा दिवसांपूर्वी लाचखोरीच्या गुन्ह्यात तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत नागवडे यांना अटक केली होती. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांच्याकडेच दाखले वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तहसीलदारांना घेराव
दाखले वेळेवर मिळत नसल्याने उद्योजक हरजितसिंग वधवा यांच्या नेतृत्वाखाली पालकांनी तहसीलदार कैलास पवार यांना घेराव घालण्यात आला. विद्यार्थी व पालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदारांना धारेवर धरले. दाखल्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन पवार यांनी आंदोलकांना दिले.
दोन दिवसांत प्रश्न सुटेल
दाखले वाटपाच्या गोंधळाबाबत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी तहसीलदार कैलास पवार यांच्याशी चर्चा केली. पवार यांनी दाखले वाटपाचे काम तातडीने सुरू करणार असल्याचे त्यांना सांगितले. दाखले वाटपाबाबत वेगळा पर्याय शोधणार आहे. दोन दिवसांत दाखले वाटपाचा प्रश्न सुटेल, असे कवडे म्हणाले.