आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तावन्न कोटींच्या वसुलीचे आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मार्चअखेर महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली अाहे. यंदा गौण खनिज विभागाला ८९ कोटी ९० लाख ७९ हजारांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. डिसेंबरअखेर त्यापैकी ३२ कोटी ८४ लाख ९८ हजार ६९८ रुपयांची वसुली झाली. येत्या दोन महिन्यांत ५६ कोटी ९५ लाख ८० हजारांचा महसूल वसूल करण्याचे मोठे आव्हान गौण खनिज विभागासमोर आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून गौण खनिज विभागाने अवैध वाळूउपसा करणाऱ्यांविरुध्द कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
जिल्ह्याच्या अनेक भागात अनधिकृत वाळूउपसा सुरू आहे. कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने ग्रामीण भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. अवैध वाळू व्यवसायाला राजकीय प्रशासकीय पाठबळ मिळत असल्याने दररोजच नदी पात्रांमधून लाखो रुपयांची वाळूचोरी होते. त्यातून लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातो.

जिल्ह्यात प्रामुख्याने नेवासे, कोपरगाव, संगमनेर, शेवगाव, राहाता कर्जत या तालुक्यात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. रात्री नदीपात्रांमधून चोरट्या मार्गाने वाळूउपसा करून शेजारील जिल्ह्यात विक्री केली जाते. यापूर्वी अवैध वाळूउपसा करताना आढळल्यास महसूल प्रशासन संबंधितांकडून तीनपट दंड वसूल करून वाहने सोडून देत असे. त्यामुळे संबंधित चोर पुन्हा वाळूउपसा सुरू करत. राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी अनधिकृत वाळूउपसा रोखण्यासाठी पाचपट दंड ठोठावण्याची तरतूद केली. तथापि, दंडाची रक्कम वाढवूनदेखील प्रशासनाला वाळू व्यावसायिक जुमानसे झाले. अवैध वाळूउपसा वाहतूक करणाऱ्यांविरुध्द थेट मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा निर्णय सप्टेंबरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. चार महिन्यांपूर्वी झालेल्या निर्णयाची प्रत अद्यापि गौण खनिज विभागाला मिळालेली नसल्याचे सांगितले जाते. प्रत मिळाल्याने वाळूउपसा करणाऱ्यांवर जुन्या नियमाप्रमाणेच कारवाई सुरू आहे.

वाळूचोरीला चाप बसवण्यासाठी नव्या सरकारने तीन निर्णय घेतले. मात्र, त्यांची अंमलबजावणी कागदोपत्रीच दिसते. गौण खनिज विभागाला २०१५-१६ या वर्षासाठी ८९ कोटी ९० लाख ७९ हजार रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ठ देण्यात आले आहे. अवैध वाळू खनिज उपसा, वाळू, मुरुम, खनिज यांच्या लिलावातून हे उद्दिष्ठ पूर्ण करायचे आहे. मात्र, उद्दिष्ठापैकी निम्मा महसूल अद्यापि वसूल झालेला नाही. उद्दिष्ठापैकी ३२ कोटी ८४ लाख ९८ हजार ६९८ महसुलाची वसुली झाली असून, येत्या दोन महिन्यांत उर्वरित ५६ कोटी ९५ लाख ८० हजार ३०२ रुपयांचा महसूल वसूल करण्याचे मोठे आव्हान गौण खनिज विभागासमोर आहे.

तालुकास्तरावर पथके
^जिल्ह्यात होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये ही पथके तैनात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचे एक स्वतंत्र पथक नगर येथे नियुक्त करण्यात आले आहे.'' संजय ब्राह्मणे, गौणखनिकर्म अधिकारी.

महिन्यात पाच लाख
^मागील महिन्याभरात आरटीओने अवैध वाळूवाहतूक करणारी १८ वाहने ताब्यात घेतली. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे अवैध वाळू वाहतूक करताना आढळल्यास संबंधित वाहनांचा परवाना निलंबित करण्यात येईल.'' राजाराम गिते, आरटीओ.

संगमनेर सर्वाधिक
संगमनेर उपविभागाला सर्वाधिक महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उपविभागात संगमनेरबरोबरच अकोले तालुक्याचाही समावेश आहे. या उपविभागाला १८ कोटींचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १० कोटी ५८ लाख ६३ हजार रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. साडेसात कोटींचा महसूल येत्या दोन महिन्यांत वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.