आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेरात तस्कराकडून सात किलो गांजा जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - संगमनेरपोलिसांना अंधारात ठेवून ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात मंगळवारी (१६ सप्टेंबर) रात्री कारवाई करत एका गांजा तस्कराला सात किलो गांजासह पकडले, तर दोन महिलांची चौकशी करून त्यांना सोडून दिले. पथकाने एका गुन्ह्यासंदर्भात तपास करताना ही कारवाई केल्याची माहिती मिळाली.

राजू पंचारिया (कासारा दुमाला) असे पोलिसांनी अटक केलेल्या गांजा तस्कराचे नाव आहे. या संदर्भातील नोंद शहर पोलिसांच्या स्टेशन डायरीत पथकाने केली असतानाही अशी कोणतीच कारवाई झाली नसल्याचे संगमनेर पोलिसांचे म्हणणे आहे. स्थानिक पोलिस आणि गुन्हेगारांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून अनेकवेळा बाहेरचे पोलिस येथे कारवाई करतात. मात्र, स्थानिक पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. पंचारिया याच्याकडे ठाण्याच्या या पथकाला सात किलोंहून अधिक गांजा मिळाला.

मंगळवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी एका खासगी गाडीतून ठाणे पोलिसांचे एक पथक एका गुन्ह्याच्या तपासासंदर्भात संगमनेरला आले होते. या पथकाने शहर हद्दीतील कासारवाडी शिवारात असलेल्या पंचािरया याच्याकडे छापा टाकत त्याच्याकडून सात किलोहून अधिक गांजा हस्तगत केला. या पथकाला पंचारिया याच्यासह गुल्ली टोपणनाव असलेल्या एका महिलेचाही शोध घ्यायचा होता. मात्र, ती सापडली नाही. पथकाने छाप्यावेळी दोन-तीन महिला आणि त्यांच्या साथीदारांनाही पोलिस ठाण्यात आणले होते. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून त्यांना सोडून दिले. त्यानंतर उशिराने हे पथक पंचारियाला घेऊन ठाणे येथे निघून गेल्याची माहिती मिळाली.

अवैध धंद्यांना पोलिसांचा मिळतो आशीर्वाद
संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या आशीर्वादामुळे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दारू, जुगार, मटक्यासारख्या व्यावसायिकांनी, तर दुकानेच उघडली आहेत. अवैध वाहतुकीने संगमनेरकरांना बेजार केले. काळ्या-पिवळीवाल्यांसोबतची पोलिसांची उठबस आणि वाहतुकीचा खोळंबा हे, तर संगमनेरकरांना िनत्याचे झाले आहे. पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनीच आता या व्यवसायाकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.