आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सातजण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - जिल्ह्यात नव्याने आलेल्या पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारताच त्यांना संगमनेरमध्ये दरोडेखोरांनी सलामी दिली. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात सातजण जखमी झाले. दरोडेखोरांनी हल्ल्यासाठी कुºहाडीचा वापर केला. मात्र, दैव बलवत्तर असल्याने हे सर्वजण बचावले.

अण्णासाहेब रखमा वर्पे (60), त्यांची पत्नी लक्ष्मीबाई (55), मुलगा सोमनाथ (22) व सून सुरेखा (20, सर्वजण संगमनेर खुर्द), विजय सखाराम बालोडे (32, खांडगाव), किसन रामा शिंदे व ताई रामा शिंदे (45, वैदूवाडी, संगमनेर) अशी दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यापैकी वर्पे कुटुंबीयांना दरोडेखोरांनी मोठ्या प्रमाणात मारहाण करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या सर्वांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास नऊ ते दहा दरोडेखोरांनी संगमनेर खुर्द शिवारातील अण्णासाहेब वर्पे यांच्या वस्तीवर जात खिडकीच्या खालील भिंतीच्या विटा काढून घरात प्रवेश केला. दरोडेखोर घरातील सामानाची उचकापाचक करत असताना जागे झालेल्या वर्पे कुटुंबीयांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र, या कुटुंबीयांवर दरोडेखोरांनी काठ्या, कुºहाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले. दरोडेखोरांनी 25 हजार रुपये किमतीचे लक्ष्मीबाई वर्पे यांच्याकडील मंगळसूत्र काढून घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जवळच्याच तीन-चार वस्त्यांवर वळवला. तेथे त्यांनी लोकांना मारहाण करत दागिने व रोकड घेऊन पोबारा केला.

दरम्यान, शहराची सूत्रे काही दिवसांपूर्वीच पोलिस निरीक्षक श्याम सोमवंशी यांनी घेतली. राजकीय पदाधिकारी, रोडरोमियोंसह अनेकांची मस्ती उतरवणा-या सोमवंशी यांनी चांगला अधिकारी असा लौकिक मिळवला. डिझेलचोरीतून थेट खून करणा-या टोळीचा पाच तासांत छडा लावणा-या सोमवंशी यांच्यासमोर आता या गुन्ह्याचीही उकल करून दरोडेखोरांना जेरबंद करण्याचे आव्हान आहे.

साकूरमध्येही झाल्या चो-या, बारदान, औषधे लांबवली
शहर पोलिस स्थानकाच्या हद्दीत दरोडेखोर धुमाकूळ घालत असताना तालुक्यातील साकूर येथेही पाच-सहा दुकाने चोरट्यांनी फोडून काही रोकड लंपास केली. विजय पेंडभाजे यांच्या बारदानच्या, बाळासाहेब सागर यांच्या औषधाच्या, संजय चोपडा यांच्या कपड्याच्या व बाळासाहेब कर्डिले यांच्या किराणा दुकानात चोरट्यांनी हात साफ केला. घारगाव पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल नसल्याची माहिती ठाणे अंमलदाराने दिली.