आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात सापडलेल्या महिला, मुलींना आता तत्काळ मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत असताना दिलासा कक्षाच्या माध्यमातून आता त्यांच्या अडचणींवर मात करता येईल. गुन्ह्यांचे स्वरुप बदलत असताना पोलिसांचा तपासही आधुनिक पद्धतीने होणे गरजेचे आहे. त्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाणे, तसेच दिलासा सेलचे (वन स्टॉप सेंटर) उदघाटन करताना ते बोलत होते. 

यावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री शिंदे म्हणाले, सध्या गुन्ह्यांचे स्वरुप बदलत आहे. गुन्ह्यांची पद्धती लक्षात घेऊन तपासाची पद्धत बदलावी लागत आहे. पारंपरिक गुन्ह्यांबरोबरच आता आर्थिक गुन्हे, सोशल मीडियाचा वापर करुन होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. बदलत्या काळानुसार तपास यंत्रणांनाही अद्ययावत व्हावे लागत आहे. त्याद्वारे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. सायबर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून जनजागृतीमुळे संभाव्य गुन्हेही टाळता येतील, असे शिंदे म्हणाले. 

या दिलासा केंद्रामध्ये मानसोपचार तज्ज्ञ, विधी, वैद्यकीय सेवा, चाईल्ड हेल्पलाइन, कौटुंबिक हिंसाचारासाठी संरक्षण अधिकारी, महिला हेल्पलाइन, पीडित महिलांना साह्य, समुपदेशन आदी सुविधा आहेत. संकटात सापडलेल्या महिला, मुली, तसेच लहान मुलांना त्यामुळे तत्काळ मदत मिळू शकणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महापौर कदम यांनी ही सुविधा महिलांसाठी उपयुक्त असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. अडचणींच्या परिस्थितीत दिलासा कक्षाचा महिलांना आधार वाटेल, असा विश्वास जिल्हाधिकारी महाजन यांनी व्यक्त केला. 
 
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिलासा कक्ष सायबर पोलीस ठाणे निर्मितीमागील भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक विजयामाला माने यांनी केले. पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सायबर गुन्ह्यांसंदर्भातील माहिती पुस्तिका आणि दिलासा कक्षाच्या घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...