आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबी व्हॅन्समुळे "शिंगणापूर लाइव्ह', सगळ्यांचे लक्ष शनिशिंगणापूरकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर/ नेवासेफाटा - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिलेला हायअलर्ट, शिर्डीची सुरक्षा अशा नेहमीच्या टेन्शनबरोबर यंदा पोलिस दलासमोर भूमाता रणरागिणी ब्रिगेडचे आव्हान उभे ठाकले आहे. शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याच्या भूमिकेवर ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई ठाम आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टर वापराची ई-मेलद्वारे मागितलेली परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुुळे मंगळवारच्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध प्रसारमाध्यमांसाठी सोमवारी रात्रीपासून ‘शनिशिंगणापूर लाइव्ह’ झाले आहे.
पुण्यातील भूमाता रणरागिणी ब्रिगेडने शनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचे जनआंदोलन हाती घेतले आहे. त्याला देवस्थानसह विविध हिंदुत्ववादी महिला संघटनांनी विरोध केला आहे. आंदोलक महिलांना आपल्या स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. दुसरीकडे महिलांना समान हक्क असल्यामुळे आंदोलन करण्याच्या निर्णयावर देसाई ठाम आहेत. आपल्याला जबरदस्तीने अडवण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधितांना गुलाबपुष्प देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला पोलिस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

भूमाता ब्रिगेडच्या सुमारे ५०० ते ६०० महिला मंगळवारी सकाळी पुण्याहून शिंगणापूरला येणार आहेत. त्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबाद नाशिकहूनही शेकडो महिला आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा ब्रिगेडने केला आहे. दोन तासांकरिता हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी देसाई यांनी मागितली होती. तथापि, शहानिशा झाल्याशिवाय परवानगी देता येणार नाही, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले. आहे. दरम्यान, शनिशिंगणापूर देवस्थानने चौथऱ्याभोवती सुरक्षाव्यवस्था वाढवली आहे.

शनिशिंगणापूर देश-विदेशात प्रसिद्ध असल्यामुळे या आंदोलनाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली आहे.वाहिन्या, तसेच प्रिंट मीडियानेही शिंगणापूरकडे लक्ष केंद्रित केले आहे. सोमवारी सायंकाळपासूनच विविध वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स शिंगणापुरात दाखल झाल्या आहेत. ही धावपळ सुरू असतानाच दुसरीकडे शनैश्वर देवस्थान, स्थानिक ग्रामस्थ, जिल्हा प्रशासन, पोलिस दल अशा विविध बैठका एकापाठोपाठ सुरू आहेत.

आंदोलकांची ताकद किती
भूमातारण रागिणी ब्रिगेडने यापूर्वी मोठे आंदोलन केल्याचे कोणाच्याही ऐकिवात नाही. परंतु शनिशिंगणापूरचा मुद्दा हाती घेतल्यामुळे ही ब्रिगेड अचानक प्रकाशझोतात आली आहे. ब्रिगेडच्या अध्यक्ष देसाई या आतापर्यंत विविध पक्षांमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनात किती महिला सहभागी होतात, याबद्दल औत्सुक्य आहे. ही पार्श्वभूमी असली तरी पोलिसही गाफील नाहीत. त्यामुळे मंगळवारच्या आंदोलनाकडे राज्याचेच नाही, तर देश-विदेशातील भाविकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

अतिरिक्त बंदोबस्त नाही
शनिशिंगणापुरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने बाहेरून अतिरक्त पोलिस बंदोबस्त मिळावा, अशी मागणी केली होती. परंतु प्रजासत्ताक दिनामुळे अतिरिक्त बंदोबस्त मिळू शकला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध पोलिस बळावरच बंदोबस्ताची भिस्त आहे. शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
मुख्यालयातील प्रशिक्षणार्थी पोलिसांसह विविध पोलिस ठाण्यांतून कर्मचारी मागवण्यात आले आहेत. या पोलिस दलाच्या बळावर शनिवारी शिंगणापूर येथील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
देवस्थान सतर्क
चौथरा परिसरात १५ फूट उंचीचे लोखंडी कठडे लावले आहेत. देवस्थानचे २५० सुरक्षारक्षक आहेत. त्यामध्ये आणखी ६० महिला रक्षक वाढवल्या आहेत. याशिवाय स्थानिक २५० पोलिसांचा बंदोबस्त आहे. सोमवारी रात्रीपासूनच येणाऱ्या भाविकांना २० फूट अंतरावरून तात्पुरती दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.