आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिभक्तांच्या नशिबी पार्किंगची पीडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान येथे येणार्‍या भक्तांच्या वाहनांसाठी फक्त एकच पार्किंग आहे. दररोज येणार्‍या सुमारे 3 हजार गाड्या ठेवण्यासाठी हे पार्किंग अपुरे पडते. देवस्थानपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांना खासगी दुकानांसमोर आपली गाडी पार्क करावी लागते. पूजेचे साहित्य विकणारे गाळेधारक जास्त पैसे आकारून भाविकांना लुबाडतात. त्यामुळे शनिदेवाच्या दारातच भाविकांना पीडा सहन करावी लागते. देवस्थान समितीने पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

नेवासे तालुक्यातील शनिशिंगणापूर हे आंतरराष्ट्रीय देवस्थान बनले आहे.साडेसाती दूर व्हावी म्हणून दररोज सुमारे 40 हजार भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, या भाविकांच्या मूलभूत सुविधांकडे देवस्थानचे दुर्लक्ष झाले आहे. शिंगणापूरला देशभरातील सर्वच राज्यांतून भाविक येतात. शिर्डी, शिंगणापूर हे दोन्हीही जोड तीर्थक्षेत्र असल्याने शिर्डीचे भाविक शिंगणापूरला हमखास दर्शनासाठी येतात. औरंगाबाद-पुणे महामार्गावरून देवस्थान केवळ 5 किलोमीटरवर आहे. त्यामुळे या मार्गावरून येणारे भाविक आवर्जून दर्शनासाठी वाट वाकडी करत येतात.

शनी मंदिरासमोर देवस्थानचे 2 एकरांचे एकमेव पार्किंग आहे. हे पार्किंग म्हणजे बेशिस्त कारभाराचा नमुना आहे. पार्किंगच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा दर आकारून लुबाडण्याचा प्रकार सर्रास होत असतो. देवस्थानचे पार्किंगजवळ येण्याअगोदरच इतर गाळेधारक व दुकानदार आलेल्या भाविकांच्या गाड्या तीन किलोमीटर अलिकडेच अडवून ठराविक गाळ्यांसमोर भाविकांना नेतात. अशा एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. देवस्थानचे पार्किंग कमी पडत असल्याने भाविकांना खासगी पार्किंगमध्ये गाडी पार्क करावी लागते.

देवस्थानच्या पार्किंगला गाडीमागे 20 रुपये आकारले जातात. गाळेधारक मात्र अव्वाच्या सव्वा दर आकारतात. अनेक खासगी गाळेधारक पार्किंगचे पैसे घेत नाहीत. मात्र, पूजा साहित्याची विक्री करताना भाविकांकडून जास्तीचे पैसे घेऊन लूट करतात.

शनिवारी, रविवार व अमावस्येला भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. गर्दीचा उच्चांक शनी अमावस्येला होतो. या दिवशी सुमारे एक लाखापेक्षा जास्त वाहने शिंगणापूरला येतात. घोडेगावकडून येणार्‍या भाविकांना शनेश्वर ग्रामीण रुग्णालयाजवळ, राहुरीकडून येणार्‍या भाविकांना मुळा कारखान्याच्या मैदानावर गाडी पार्क करावी लागते. त्यातच दुचाक्यांची बेशिस्त वाहतूक पायी चालणार्‍या भाविकांना अडथळा निर्माण करतात.

देवस्थानच्या पार्किंंगमधील सुरक्षा कर्मचार्‍यांनी भक्तांच्या गाड्यांची काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र, या ठिकाणी कर्मचारी केवळ वसुलीसाठीच असल्याचे दिसते. वाहन लावण्यासाठी कर्मचारी नसल्याने पार्किंंगमध्येही वाहतूक ठप्प होते.

पे अँण्ड पार्क असल्याने भाविकांना वाहनाच्या सुरक्षेची अपेक्षा असते. मात्र, पार्किंंमध्येच अनेकवेळा चोर्‍यांचे प्रकार घडतात. कधी कधी तर वाहनेच पार्किंंगमधून चोरीस गेल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे शनैश्वर देवस्थानच्या नावलौकिकाला तडा जात आहे.

यात्राकाळातच पार्किंग सोय
शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये यात्रेच्या दिवशी संस्थानच्या वतीने गावाबाहेर तीनही दिशेला स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था असते. मुळा कारखाना मैदान, शनेश्वर ग्रामीण रुग्णालय प्रांगण व देवस्थानच्या शनेश्वर विद्यालयाच्या जागेत पार्किंग करण्यात येते. या पार्किंग व्यवस्थेची दररोज गरज पडत नाही. ’’ - प्रा. शिवाजी दरंदले, अध्यक्ष, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट.

पार्किंगचे रुंदीकरण गरजेचे
शनिशिंगणापूर येथील देवस्थान व पार्किंगमध्ये असलेला दुहेरी मार्ग नेहमीच जाम असतो. या मार्गाचे रूंदीकरण करणे आवश्यक आहे. देवस्थानमध्ये पार्किंगची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याकडे देवस्थान समितीने लक्ष देऊन भाविकांची लुबाडणूक थांबवणे आवश्यक आहे.’’ - एकनाथ सुरोशे, भाविक.