आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिंगणापूर’ गैरव्यवहार चौकशी लवकरच..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शनिशिंगणापूर देवस्थानने केलेल्या आठ कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचे 15 दिवसांत आदेश देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी दिली.

शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विश्वस्त मुळा एज्युकेशन व कारखान्याचे कर्मचारी आहेत. देवस्थानचा कार्यकारी अधिकारी हे या नेत्यांचा घरगडी असल्यासारखे वर्तन करतात. इतर देवस्थानांनी मुख्यमंत्री सहायता निधीकडे निधी असताना, शनिशिंगणापूर देवस्थानने मात्र, दुष्काळाच्या नावाखाली परस्पर 2 कोटी 76 लाख खर्च केला. नेवासे तालुक्यातील तीन छावण्यांना चारा पुरवला नसताना 72 लाखांच्या चार्‍याची बोगस बिले काढल्याचे देवस्थानने धर्मादाय आयुक्तांना दिलेल्या अहवालात म्हटले आहे. विश्वस्तांनी गरजूंना नोकर्‍या देण्याऐवजी नातेवाईकांना नोकर्‍या दिल्या, तर मुळा एज्युकेशन सोसायटीला 4 कोटी, डेंटल कॉलेजसाठी 1 कोटी, पाटबंधारे विभागाच्या (लिफ्ट) थकबाकीपोटी 29 लाख, टँकरने पाणीपुरवठय़ासाठी 60 लाख रुपये काढले. प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत. त्यामुळे या कामात 8 कोटींहून अधिक गैरव्यवहार झाला आहे. या प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. गैरव्यवहाराची रक्कम विश्वस्तांच्या खासगी मालमत्तेतून वसूल करावी, अशी मागणी दहातोंडे यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांकडे केली. या प्रकरणी पंधरा दिवसांत चौकशी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.