नगर- शिवसेनेचे मुखेड (जि. नांदेड) येथील तालुकाप्रमुख शंकर माधव ठाणेकर यांच्या खूनप्रकरणातील ५ दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी आणखी काही जबरी चोऱ्या व दरोड्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर "मोक्का'अंतर्गत कारवाई करणार असल्याचे सूतोवाच पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी केले आहे. यापुढे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर जरब बसवण्यासाठी "मोक्का'ची वेसण घातली जाणार आहे.
जामखेडजवळ बीड रस्त्यावर झालेल्या ठाणेकर यांच्या खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. खुनामागे काही राजकीय वैमनस्य असावे, अशी शक्यता प्रारंभी वर्तवण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाकरिता तीन पथके स्थापन करण्यात आली होती. त्यांनी नगर, पुण्यासह इतर जिल्ह्यांतही तपास केला. मंगळवारी राहुरी परिसरात ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींनी सुपा, बेलवंडी, श्रीगोंदे व जामखेड परिसरात दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून २ गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, संजय पाटील, सहायक निरीक्षक राहुल गायकवाड, सुनील टोणपे, किरणकुमार परदेशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल राकेश खेडकर, दीपक हराळ, रमेश माळवदे, बाबा गरड, संदीप पवार, दत्ता हिंगडे, योसेफ साळवे, उमेश खेडकर, रावसाहेब हुसळे, सचिन मिरपगार, मधुकर शिंदे, प्रसाद भिंगारदिवे, भािगनाथ पंचमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली. टोळीतील पाच दरोडेखोर गजाआड झाले असले, तरी या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रवी जलशा भोसले हा मात्र अद्यापही फरार आहे.
कावेबाज "मास्टरमाइंड'
प्रशांत कोळी (वय २८, निगडी, पुणे), बबन ऊर्फ अतुल घावटे (२५, श्रीगोंदे), किरण ऊर्फ गोट्या हरिभाऊ सोनवणे (१९, पारनेर), संदीप ऊर्फ अण्णा अर्जुन धावडे (२१, श्रीगोंदे) व उमेश भानुदास नागरे (२५, लोणी, ता. राहाता) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकजण सुपा पोलिस ठाण्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक आहे. रवी जलशा भोसले हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने अनेकदा पोलिसांना हुलकावणी दिली आहे. लवकरच तो गजाआड होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गुन्हेगारी नियंत्रणात येईल
ठाणेकर यांचा खून करणाऱ्या टोळीतील काही आरोपी फरारी आहेत. या आरोपींनी पुणे व आजूबाजूच्या जिल्ह्यांतही जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर "मोक्का' कायद्यांतर्गतही कारवाई करण्याचा प्रस्ताव करणार आहोत. ही टोळी पकडल्यामुळे दक्षिणेतील गुन्हेगारीवर नियंत्रण येईल, असा विश्वास आहे. जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या इतर टोळ्यांचाही अशाच पद्धतीने बंदोबस्त केला जाईल. लखमी गौतम, पोलिस अधीक्षक, नगर.