आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डीत शंकराचार्यांवर गुन्हा, बस जाळण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - द्वारकापीठाचे शंकराचार्य यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने देश-विदेशातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हिंदू-मुस्लिम धर्मीयांच्या जातीय भावना दुखविल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात शंकराचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साईभक्त व शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सकाळी साईबाबा मंदिर परिसरात निषेध सभा घेतली. या वेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, विजय कोते, विजय जगताप, उत्तम कोते, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, मौलाना असगर अली, नीलेश कोते, शिवाजी चौगुले यांच्यासह हजारो साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांनी शंकराचार्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. शंकराचार्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

रामनवमीनिमित्त शिर्डीत दरवर्षी रथयात्रा व संदल मिरवणूकही निघते. या दोन्ही प्रथा साईबाबांनीच सुरू केल्या. केवळ प्रसिद्धीसाठी शंकराचार्यांनी आकस धरून हे वक्तव्य केल्याचे शिवसेनेचे कमलाकर कोते म्हणाले.

संस्थानची भूमिका काय?
स्वरूपानंद यांनी केलेल्या वक्तव्यावर देश-विदेशात तीव्र प्रतिक्रिया उमटली असताना साईबाबा संस्थानचे प्रशासकीय मंडळ मात्र काहीही बोलायला तयार नाही.

बस जाळण्याचा प्रयत्न
काही संतप्त तरुणांनी या प्रकरणाचा निषेध म्हणून पुणे-पाचोरा बस शिर्डीकडे येत असताना ती जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच तेथे धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

पुन्हा वादग्रस्त विधान
द्वारका - ज्यांना साईंची पूजा करायची, त्यांनी ती खुशाल करावी. मात्र, त्यांनी नंतर गंगास्नान करू नये, मंदिरात जाऊ नये किंवा रामनामाचा जपही करू नये, असे सांगत स्वरूपानंद यांनी मंगळवारीही हेका कायम ठेवला.