आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री विखेंवर चुकीचे आरोप करून दिशाभूल करू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - तालुक्याच्या ज्वलंत प्रश्नांवर आमदार शंकरराव गडाख यांनी आपली भूमिका जाहीर करावी. कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंवर चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करू नये. घाटमाथ्यावरील पाणी मुळा भंडारदराकडे वळवण्यासाठी विखेंचा गेले दहा वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र, शेतकरीविरोधी निर्णय घेणार्‍या जलसंपदामंत्री तटकरे व पालकमंत्री मधुकर पिचड यांना सोनईला बोलावून सत्कार केले जातात. ही शोकांतिका आहे, अशी टीका नेवासे येथील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांनी बुधवारी केली.

भंडारदराप्रमाणेच मुळावरील बंधारेही भरू द्यावे, चार रोटेशनचे वेळापत्रक जाहीर झाले पाहिजे, उसाला 3 हजार रुपये पहिली उचल मिळावी आदी मागण्यांसाठी नेवासे फाटा येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुरकुटे बोलत होते. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, शेतकरी संघटना या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन आमदार गडाख यांच्या विरोधकांचे ठरले. मुरकुटे म्हणाले, आमदार गडाख यांनी तालुक्यातील समस्यांबाबत आपली भूमिका मांडावी. ज्यांनी जिल्ह्यातील पाणी पळवले. त्यांचा सत्कार होतो, हे दुर्दैवी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे अल्पसंख्याकचे तालुकाध्यक्ष विश्वास जावळे, पंचायत समिती जानकीराम डौले, शिवसेनेचे बाळासाहेब पवार, शेतकरी संघटनेचे बाबासाहेब खराडे, राजू भंडारी, महिला आघाडीच्या दीपाली कोरडे, प्रा. अशोक ढगे यांची भाषणे झाली. तहसीलदार अरुण उजागरे व महावितरणचे एस. आर. कोतवाल यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाकचौरे, पंचायत समिती सदस्य जनार्दन जाधव, युवक काँग्रेसचे नितीन दिनकर, अशोक तांबे, काँग्रेस शहराध्यक्ष डॉ. मनीषा वाघ, शहराध्यक्ष गफूर बागवान सहभागी होते. या आंदोलनामुळे नगर-औरंगाबाद, शेवगाव रस्त्यावर वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या.