आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Election Campaign Rally In Ahmednagar

बबनरावांची काय अडचण झाली माहिती नाही, शरद पवार यांनी उडवली बबनराव पाचपुतेंची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बबनराव पाचपुते यांना आम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले. नंतर कॅबिनेटमध्येही संधी दिली. पण त्यांची काय अडचण झाली हे मला माहिती नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाचपुते यांच्या पक्षनिष्ठेची खिल्ली उडवली.
राष्ट्रवादीचे नगर शहर मतदारसंघातील उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेसाठी पवार गुरुवारी नगरला आले होते. सभेपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार अरुण जगताप, जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, सरचिटणीस सोमनाथ धूत आदी उपस्थित होते.
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने प्रथम 100 उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्या ठिकाणचे अपक्ष आमच्या पक्षात आले होते, त्या जागांचाही त्यात समावेश होता. त्यामुळे 6 जागा वगळता सर्व जागा लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे सांगत पवार यांनी आघाडी तुटल्याचे खापर काँग्रेसच्या माथी फोडले.
भ्रष्टाचारासंदर्भात आरोप केले जातात, पण जगात सर्वाधिक पाटबंधारे प्रकल्प भारतात, त्यातही महाराष्ट्रात आहेत. प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण व्हायला हवा, पण त्यासाठी निधीची तरतूद कमी असते. त्यामुळे विलंब होतो. विलंब झाल्याने प्रकल्पाची किंमत वाढते. हे माहिती असतानाही काहीजणांनी संशयाचे भूत निर्माण केले, असे पवार म्हणाले. कांदा हे जिरायतदारांना दोन पैसे मिळवून देणारे पीक आहे. पण त्याला जीवनावश्यक यादीत टाकल्याने निर्बंध आले. संपत्तीत वाढ झाल्याचे बोलले जाते, पण पाच वर्षांपूर्वी असलेल्या जमिनीची व घराची किंमत आजच्या बाजारमूल्यानुसार वाढते, असे पवार यांनी स्पष्ट केले. वेगळ्या विदर्भाचा निर्णय तेथील जनतेला विचारूनच घ्यायला हवा. ते जायचे म्हणत असतील, तर हा निर्णय घ्यावा, असेही पवार यांनी सांगितले.

शेतकरीहिताची भूमिका घ्या
केंद्र सरकारच्या शेतीविषयक धोरणावर पवार यांनी टीका केली. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यावी; अन्यथा आम्हाला लोकशाहीच्या चौकटीत राहून वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.