आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करू - शरद पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुसर्‍या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजास आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी सर्व कागदपत्रे घेऊन अण्णा डांगे यांनी दिल्लीत यावे. संबंधित मंत्र्यांशी त्यांची भेट घडवून आणू, असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी दिले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शिल्पसृष्टीच्या उद्घाटनानंतर झालेल्या सभेत पवार बोलत होते. व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे, शेळी-मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते, खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, विजयसिंह मोहिते, चंद्रशेखर घुले, रामराजे निंबाळकर, विक्रमसिंह पाचपुते, पोपटराव गावडे आदी उपस्थित होते.

‘धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भव्य मेळावा’ अशी या कार्यक्रमाची जाहिरात करण्यात आल्याने राज्यभरातून धनगर समाजाचे सुमारे दोन लाख लोक या वेळी उपस्थित होते. प्रास्ताविकात ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली. राजकारणात साडेतीन टक्के आरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. विषय आरक्षणाचा असला, तरी त्यानंतर फक्त पिचड यांनीच या मागणीचा उल्लेख केला. पवार भाषणास उभे राहिल्यावर त्यांनी पाणी व इतर प्रश्नांवर बोलण्यास सुरुवात केली.लोकांनी आरक्षणावर बोला, असा गलका केला. त्यावर त्यांनी ‘आरक्षणापेक्षा पाणी महत्त्वाचे,’ असे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावातून आरक्षणाचा आवाज खूपच वाढल्यावर त्यांना नाइलाजाने या विषयावर बोलावे लागले.

धनगर समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण होण्यासाठी सर्व जबाबदारी मी घेतो, असे पवार यांनी सांगितले. परंतु उपस्थितांमधून ‘आरक्षण जाहीर करा’, अशी घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे पवार यांनी आरक्षणाबरोबरच पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत भाषण आटोपते घेतले.

अहिल्याबाईंच्या कार्याचा गौरव करताना पवार म्हणाले, मिळालेली सत्ता लोकांसाठी वापरायची असते, हे अहिल्याबाईंनी दाखवून दिले. त्यांनी केवळ हिंदूच नव्हे, तर मुस्लिमांच्या धार्मिक स्थळी भाविकांसाठी सुविधा निर्माण केल्या. अहिल्याबाईंनी सामान्यांसाठी अन्नछत्रे उभी केली. केंद्र सरकारची अन्न सुरक्षा योजना ही त्याचेच पुढचे रूप आहे.

चौंडी येथील गढीच्या नूतनीकरणासाठी 4.70 कोटी मंजूर आहेत. त्यापैकी 2 कोटी 6 लाख रुपये देण्यात आले आहेत. हा आराखडा 38 कोटी 60 लाखांचा आहे. पूर्ण स्मारक तयार झाल्यांतर राष्ट्रपतींच्या हस्ते ते देशाला अर्पण करण्यात येणारअसल्याचे भुजबळ यांनी सांगितले. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व ग्रामविकास विभागाच्या धार्मिक क्षेत्र विकास निधीच्या माध्यमातून चौंडीचा विकास करण्यात येईल.

संधी दिल्यास महिलाही कर्तृत्व दाखवू शकतात
कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडेच नसतो. महिलांना संधी व अधिकार मिळाल्यास त्या कर्तृत्व दाखवू शकतात, हे अहिल्याबाईंनी सिद्ध केले, असे पवार म्हणाले. मात्र, या विधानाचा अन्वयार्थ सुप्रिया सुळे यांना मोठे पद देण्याशी उपस्थितांनी लावला. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

नेत्यांच्या खुशामतीची स्पर्धा
खुशामत करण्याची अक्षरश: स्पर्धाच लागली होती. सर्वांत प्रथम राधाकृष्ण विखे यांनी अन्न सुरक्षा योजना आणल्याबद्दल सोनिया गांधी यांचे गोडवे गायले. धनगर समाजाच्या माणसास गांधींनी कर्नाटकात मुख्यमंत्री केल्याचे त्यांनी सांगितले. पिचड यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी शरद पवार यांची तुलना केली. पवार यांनी केलेल्या कामामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. शेतकर्‍यांना हमीभाव मिळाला व त्यामुळे अन्न सुरक्षा विधेयक काँग्रेसला आणावे लागले, अशी वरकडीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. कार्यक्रम कोणता व आपण काय बोलतो, याचे भान फक्त जयंत पाटील वगळता कोणालाही असल्याचे दिसले नाही.

सर्व मेळावा राष्ट्रवादीमय
व्यासपीठावर काँग्रेसचे विखे, भाजपचे खासदार गांधी व आमदार राम शिंदे वगळता राष्ट्रवादीचेच नेते होते. त्यामुळे हा कार्यक्रम राष्ट्रवादीने ‘हायजॉक’ केल्याची चर्चा उपस्थितांत होती. समाजाला दिशा देणारे विचार ऐकायला मिळतील, या आशेने यवतमाळपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंत आलेल्या लोकांची नेत्यांच्या भाषणांनी निराशा झाली.