आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे मोठे आव्हान सरकारच्या पुढे आहे. ग्रामीण महाराष्ट्रातून भाजप शिवसेनेला प्रतिसाद मिळाला, पण आज त्यांची वेगळी मते आहेत. कांदा उत्पादक अस्वस्थ आहेत, तर शेतकरी संघटना आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाच संकटात असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांसह कारखानदार टिकावेत यासाठी एकत्रित बसून व्यवहार्य मार्ग काढावा लागणार आहे, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

पवार म्हणाले, मी नाशिकला गेलो होतो, त्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता दिसली. ऊस उत्पादक दर वाढवण्यासाठी आंदोलने करत आहेत. या सर्व बाबींकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारखान्यात साखर, वीज इथेनॉलचे उत्पादन केले जाते. विजेची खरेदी राज्य सरकार करते, पण त्याचे पैसे दोन महिन्यांनी दिले जातात. इथेनॉल केंद्र सरकारमार्फत खरेदी केले जाते. त्याचे पैसे अडीच महिन्यांनी मिळतात. असे असताना कारखान्यांनी १४ दिवसांत उसाचे पेमेंट करावे असे बंधन घालण्यात आले आहे.

पूर्वी हप्ता पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत असल्याने टप्प्याटप्प्याने साखर विक्रीला आणली जात असल्याने साखरेलाही योग्य भाव मिळत होता. पण १४ दिवसांत पैसे देण्याचे बंधन घातल्यामुळे अडचण झाली. विजेचे इथेनॉलचे पैसे सरकारकडून येणे असतानाही त्याला दोन ते अडीच महिन्यांची मुभा दिली. आम्ही साखरेच्या निर्यातीवर अनुदान दिले होते. पण आता सरकारने हे अनुदान बंद केल्याने साखरेची निर्यात थांबली. या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारखानदार ऊस उत्पादकांना टिकवण्यासाठी केंद्र राज्य सरकारने व्यवहार्य निर्णय घ्यावा, असे पवार म्हणाले.

शेतीशी निगडीत अनेक प्रश्न समोर येत आहेत. दुधाचे दर २४ रुपये होते, ते १७ रुपयांपर्यंत घसरले. जनावरांना खाद्य देण्याचा खर्च वाढल्याने ते परवडत नाही. त्यामुळे जनावरे विक्रीसाठी बाजारात आणली जात आहेत. ही बाब चिंतेची आहे. सरकार नवीन आहे. सर्वच प्रश्न लगेच सुटणार नाहीत. पण सोयाबीनचे भाव घसरले. कापूस उत्पादकांचीही चिंता वाढली. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात आल्याचे चिन्ह दिसत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात आणणे आम्हाला मान्य नाही.

राज्याची सत्ता असणाऱ्यांना शेतीचे ज्ञान किती आहे, हे सर्वांना माहिती आहे. आम्ही एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला, तर लगेच इनकम टक्सची केस करण्यात आली. आता लोकांना चूक कळली आहे. मी रस्त्याने जाताना बोर्ड पाहिले आहेत, त्यावर साहेब आम्ही चुकलो असे लिहिले होते. हजारो मेसेजही आम्हाला आले. याचा अर्थ आमची ताकद वाढली असे म्हणणार नाही, पण आम्हाला काम करण्यास अधिक ताकद मिळाली आहे, असे पवार यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.