आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी वाचवायची असेल तर प्रत्येक घरात भाषेचे संस्कार व्हावेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मराठी ही अत्यंत सार्मथ्यशाली भाषा आहे. ती वाचवायची असेल, तर प्रत्येक घरात मुलांवर भाषेचे संस्कार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.

सावेडीतील संवादिनी महिला मंडळातर्फे ‘नथुराम ते देवराम - लाखमोलाच्या गप्पा’ हा कार्यक्रम राजमोती लॉन्स येथे झाला. नाट्यकारकिर्दीतील वेगवेगळ्या अनुभवांबरोबर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयांवर त्यांनी मनमोकळेपणे भाष्य केले. कधी विनोदी किस्से सांगत, तर कधी शर्करावगुंठित कडवट उपदेशाचे डोस पाजत त्यांनी र्शोत्यांना अंतर्मुख केले.

मराठी भाषेबद्दल ते म्हणाले, भाषेला व समाजाला वळण लावण्याचे, समाज घडवण्याचे सार्मथ्य महिलांमध्ये असते. संस्कारक्षम वयात मूल जास्त काळ आईच्या सहवासात असते. उत्तम संस्कार करून आईच मुलाला घडवू शकते. ‘मी नथुराम बोलतोय..’ या नाटकासंबंधी पोंक्षे म्हणाले, 1988 पासून 2000 पर्यंत या नाटकाला सेन्सॉर बोर्डाची परवानगी मिळत नव्हती. नंतरही या नाटकावर बंदी आणली गेली. अहिंसक होता होता आपण नपुंसक कधी झालो हे कळलेच नाही, असे कठोर पण वास्तवदर्शी भाष्य त्यांनी सद्यस्थितीवर केले. ‘नथुराम’, ‘देवराम’सह विविध व्यक्तिरेखांचा काही भाग त्यांनी यावेळी साभिनय सादर केला. आवाजातील हुकमत, संवादफेकीतील कौशल्य आणि अभिनय सार्मथ्याचे दर्शन यानिमित्ताने त्यांनी प्रेक्षकांना घडवले. नगरचे रसिक दर्दी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कौसल्या, जिजाऊ होण्याचा प्रयत्न करा
पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र आणि शिवाजी महाराज जन्माला यावेत, अशी आपण नुसती वाट पाहतो, पण त्यासाठी प्रयत्न काहीच करत नाहीत. असे वीरपुरुष जन्माला येण्यासाठी प्रत्येक महिलेने कौसल्या व जिजाऊ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांना मैदानी खेळांच्या सीडी आणून देऊन संगणकापुढे बसवल्यावर शिवाजी कसा जन्माला येणार, असा सवाल शरद पोंक्षे यांनी केला.