आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीफजींच्या वंशजांची भातोडी व नगर वस्तू संग्रहालयाला भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - इतिहासप्रसिद्ध भातोडीच्या लढाईत शहाजीराजांची तलवार तळपली. त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या निजामशाही सैन्याला गनिमी कावा वापरून मोठा विजय मिळाला. दुर्दैवाने या लढाईत शहाजीराजांचे धाकटे भाऊ शरीफजी धारातिर्थी पडले. सन 1624 मध्ये घडलेल्या या घटनेनंतर 390 वर्षांनी शरीफजींच्या वंशजांनी सोमवारी भातोडीतील त्यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन कृतज्ञभाव व्यक्त केला.
शरीफजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढच्या पिढ्यांचे काय झाले, हे आजवर फारसे ठाऊक नव्हते. नगरपासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या भातोडी परिसरात शरीफजींची समाधी नेमकी कोठे आहे, याविषयीही मतभिन्नता होती. तेथील सामाजिक कार्यकर्ते किशोर कदम आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन समाधीचा शोध घेतला. काही वर्षांपूर्वी तेथे केलेल्या उत्खननात अस्थीही सापडल्या. ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे, प्रमोद मांडे यांनी या समाधीस्थळाला भेट दिली.

शरीफजींचे वंशज दौंड तालुक्यातील खनवट (जि. पुणे) येथे असल्याची माहिती कदम यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर अकराव्या पिढीतील वंशजांपैकी अ‍ॅड. युवराज शरीफजी राजेभोसले, शाहू, भाऊसाहेब राजेभोसले, अण्णासाहेब शहाजीराजे भोसले, नितीन शिवाजीराव राजेभोसले, शाहू संभाजी राजेभोसले, अमरसिंह सुमेरसिंह राजेभोसले आणि धैर्यशील चंद्रशेखर राजेभोसले यांनी सोमवारी भातोडीला भेट दिली. समाधीचे त्यांनी दर्शन घेतले. ग्रामदैवताला अभिषेक केला. नंतर या सर्वांनी नगर येथील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला भेट दिली. त्यांनी दिलेल्या शरीफजींच्या वंशावळीचा स्वीकार संग्रहालयाचे अभीरक्षक संतोष यादव यांनी केला. या सर्वांचा भातोडीचे ग्रामस्थ व संग्रहालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाहशरीफ दर्ग्यालाही त्यांनी भेट दिली. शरीफजींचे चित्र उपलब्ध असल्याची माहिती त्यांच्या वंशजांनी दिली.
स्मारकासाठी प्रयत्न
४शरीफजींचे स्मारक भातोडीत उभे रहावे, यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येईल. या समितीत ग्रामस्थ, वंशज, तसेच इतिहास संशोधक प्रमोद मांडे आदींचा समावेश असेल.’’ - अ‍ॅड. युवराज राजेभोसले.
शरीफजींचा जन्म 1596चा
शहाजीराजांच्या जन्मानंतर दोन वर्षांनी शरीफजी यांचा जन्म सन 1596 मध्ये झाला. त्यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई होते. भातोडीच्या लढाईत त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती ‘शिवभारत’, तसेच रियासतीमध्ये मिळते, असे संग्रहालयाचे अभीरक्षक संतोष यादव यांनी यावेळी सांगितले.
छायाचित्र - भोसले घराण्याची वंशावळ दाखवताना संग्रहालयाचे अभीरक्षक संतोष यादव.