आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्लेखन होण्यापूर्वीच नवीन वास्तूला मंंजुरी, शेंडी येथील आरोग्य केंद्राची इमारत वादात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अकोले तालुक्यातील शेंडी येथील धोकादायक झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या निर्लेखनाला अधीक्षक अभियंत्यांकडून मंजुरी मिळाली नसताना तेथे नवीन इमारत बांधण्यास जिल्हा परिषदेने मंजुरी दिली. जुनी इमारत पाडल्याशिवाय नवीन कामच सुरू करता येत नाही. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे. एस. नागापुरे यांनी माहिती देण्यास नकार दिला.

आरोग्य विभागाने निर्लेखनासाठी हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवला होता. त्याला सभेने मंजुरी दिली आहे. जुनी इमारत पाडण्यासाठी अधीक्षक अभियंत्यांच्या मान्यतेची गरज आहे. पण अद्यापि मंजुरी मिळालेली नाही. त्यापूर्वीच नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी कशी मिळाली, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य उपस्थित करत आहेत. घाईत नवीन इमारतीची मंजुरी घेण्यामागे काय गौडबंगाल आहे, याची चर्चा सुरू आहे.

यासंदर्भात पत्रकारांनी बांधकाम विभागात माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता जे. एस. नागापुरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याला सर्वसाधारण सभेची मंजुरी असल्याचे सांगितले. पण जुनी इमारत पाडण्यापूर्वी नवीन इमारतीला मंजुरी देता येते का, अशी विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

जुनी इमारत पाडल्याशिवाय नवीन इमारतीचे काम सुरू करता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. ही मंजुरी मिळण्यास आणखी अवधी लागणार आहे. त्यानंतर इमारतीचे काम सुरू करण्याचा मुहूर्त लागेल, पण पावसाळा सुरू झाल्यास इमारतीच्या स्लॅबचे काम करता येणार नाही. जिल्हा परिषद सदस्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. दत्तात्रय सदाफुले म्हणाले, जर इमारत निर्लेखनाला अधीक्षक अभियंत्यांची मंजुरी येण्यापूर्वीच नवीन इमारतीच्या बांधकामाला मंजुरी दिली असेल, तर या प्रकरणाची सखोल चाैकशी होणे गरजेचे आहे.

रिकाम्या जागेत बांधणार नवीन इमारत

निर्लेखन प्रस्तावाला जानेवारीत झालेल्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार पाडण्याची कार्यवाही बांधकाम विभाग करेल. तेथेच जवळ असलेल्या रिकाम्या जागेत नवीन इमारत बांधण्यास मंजुरी मिळाली आहे.'' डॉ.पी. डी. गांडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर.

ज्यांनी माहिती दिली त्यांनाच विचारा...

इमारत बांधण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण नाही. तुम्ही हे मला विचारण्यापेक्षा ज्यांनी तुम्हाला माहिती दिली त्यांनाच विचारा. तोच तो प्रश्न विचारू नका. कारण आम्ही सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली आहे.'' जे.एस. नागापुरे, कार्यकारी अभियंता, (उत्तर)