नगर- कामावरून कमी केलेल्या शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा विभागातील अब्दुल दादाभाई शेख यांना आधीची सेवा पूर्ववत धरून मागील फरकासह कामावर घेण्याचा आदेश कामगार न्यायालयाने दिला आहे.
शेख गेल्या काही वर्षांपासून शिपाई ते पाणीपुरवठा विभागातील कायम कर्मचारी म्हणून काम करत होते. ग्रामपंचायतीने ऑक्टोबर 2010 मध्ये त्यांना कामावरून कमी केले. याबाबत आयटकप्रणित ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने सरपंच व ग्रामविकास अधिकार्यांकडे तक्रार केली. परंतु त्यांची दखल न घेतल्यामुळे नगरमधील सहायक कामगार आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
सुनावणीस ग्रामपंचायतीच्या वतीने कोणीही उपस्थित राहिले नाही. म्हणून कामगार अधिकार्यांनी हे प्रकरण समेटमध्ये दाखल करून नाशिकला पाठवले. नंतर हे प्रकरण कामगारांच्या वतीने कामगार न्यायालयात दाखल झाले. ग्रामपंचायतीला नोटिसा मिळूनही ते न्यायालयात हजर झाले नाहीत, म्हणून त्यांच्याविरुद्ध आदेश झाला. संघटनेचे सचिव अँड. सुधीर टोकेकर यांनी पुरावे सादर करून ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे शेख यांना कामावरून कमी केल्याचे दाखवून दिले. या प्रकरणातील साक्षीपुरावे ग्राह्य धरून कामगार न्यायाधीश डी. एच. शर्मा यांनी ऑक्टोबर 2010 पासून पूर्ववत सेवा धरून अब्दुल शेख यांना मागील फरकासह रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत. सहा महिन्यांच्या आत निकाल लागल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.