आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirdi Lok Sabha Constituncy In Marathi, Bhausaheb Wakchaure, Divya Marathi

तीन मंत्री असूनही शिर्डी मतदारसंघ असुरक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - शिर्डी मतदारसंघ राखीव असल्याने अनेक मान्यवर नेत्यांनी प्रचाराऐवजी घरी बसणेच पसंत केले. दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांप्रमाणेच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. अपवाद वगळता एकाही मोठय़ा नेत्याची सभा संगमनेरमध्ये झाली नाही.


तीन मंत्री असलेला शिर्डी हा देशातील काँग्रेस उमेदवारासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. मात्र, या मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचोरे अंतर्गत राजकारणामुळे अडचणीत सापडले आहेत. संगमनेरमध्ये त्यांच्यासाठी केवळ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकहाती किल्ला लढवला. तथापि, त्यांना कार्यकर्त्यांची फारशी साथ मिळाली नाही. थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा अपवाद वगळता एकही मातब्बर काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचा नेता वाकचौरेंसाठी तालुक्यात फिरकला नाही.


महायुतीचे सदाशिव लोखंडे यांना अनुकूल वातावरण तयार झाले असतानाही केवळ येथील पदाधिकार्‍यांच्या मतलबी राजकारणामुळे शिवसेना, भाजपचा मातब्बर नेता मतदारसंघात आला नाही. शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे व खासदार संजय राऊत यांचा अपवाद ठरला. गोर्‍हे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी, तर राऊत यांनी एका सभेसाठी हजेरी लावली.


कोणत्याही नेत्याची जाहीर सभा, रॅली, पदयात्रा न झाल्याने या मतदारसंघात निवडणूक आहे की नाही असेच वातावरण शेवटपर्यंत राहिले. संगमनेरात किती टक्के मतदान होते, यावर या उमेदवारांच्या मताधिक्क्याची गणिते अवलंबून असतील. अखेरच्या टप्प्यात वाकचौरे यांना मतदारसंघात प्रचार करणेही अवघड बनले होते. शिवसेनेतील वादाचा परिणाम लोखंडे यांना बसणार असला तरी देशभर असलेली नरेंद्र मोदी यांची लाट आणि सामान्य मतदार त्यासाठी करणार असलेल्या मतदानाचा फायदा लोखंडे यांना होण्याची शक्यता आहे.


मतदानासाठी कडक उपाययोजना
पारेगाव बुद्रुक, तळेगाव व अमृतनगर येथील पाच मतदान केंद्रे संवेदनशील ठरवण्यात आली. संगमनेरमधील एक मतदान अतिसंवेदनशील आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करत आठ जणांवर नगर, नाशिक व पुणे या तीन जिल्ह्यांतून वर्षभरासाठी हद्दपारीचे आदेश बजावण्यात आले.


111 गावे संगमनेर विधानसभा मतदारसंघात
265 केंद्रे एकूण मतदान
2,48,685 एकूण मतदार
24 नियुक्त सेक्टर ऑफिसर
1485 मतदान कर्मचारी
पुरुष - 1, 30, 364

स्त्रिया - 1, 18, 321