आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईभक्तांना कमिशन एजंटांचा त्रास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुनीता ठाकरे - साळुंखे यांनी दोन महिन्यांपूर्वी शिर्डीतील कमिशन एजंटांविरोधात कारवाई केली होती. मात्र, पुन्हा या कमिशन एजंटांनी डोके वर काढले असून त्यांच्या दादागिरीमुळे साईभक्तांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शिर्डीतील या कमिशन एजंटांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी साईभक्त आणि ग्रामस्थांकडून होत आहे.

र्शद्धा आणि सबुरीचा संदेश संपूर्ण जगाला देणार्‍या साईबाबांच्या साईनगरीत दररोज हजारो भक्त येतात. शिर्डीत प्रवेश करताक्षणी भाविकांना पॉलिशवाले (कमिशन एजंट) यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. खासगी ट्रॅव्हल्स अथवा बसने येणार्‍या प्रवाशांना त्यांचा मोठा त्रास होतो. बहुतांशी कमिशन एजंट मद्यधुंद असतात. त्यात गुन्हेगारांचाही समावेश आहे, हे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले आहे.

पोलिस प्रशासन आणि नगर पंचायतने संयुक्तपणे कमिशन एजंटांबाबत निश्चित धोरण घेण्याची गरज आहे. सध्या पाकीटमारी व धूमस्टाईल होणार्‍या चोर्‍यांत मोठी वाढ झाली आहे. कमिशन एजंटांचे पोलिस खात्याकडून व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. तसेच त्यांना काम करण्याचा परवाना देताना ड्रेस कोड असण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे होत नाही. पोलिस प्रशासनाने कमिशन एजंटांविरोधात पुन्हा धडक कारवाई सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांकडून होत आहे.

आपलीच सेवा घेण्याचा एजंटांचा आग्रह - शिर्डीत साईभक्तांच्या वाहनाभोवती दहा ते पंधरा कमिशन एजंट घेराव घालून जेवणासाठी हॉटेल व राहण्यासाठी लॉजिंग सुविधा उपलब्ध असल्याचे सांगतात. या सुविधा किफायतशीर दरात असल्याचे सांगून आपल्याबरोबरच यावे असा आग्रह ते धरतात. बर्‍याचदा भक्त या सुविधेला नकार देतात. मात्र, कमिशन मिळण्याच्या लालसेपोटी एजंटांचा ससेमिरा चालूच असतो. याचा मानसिक त्रास भाविकांना सहन करावा लागत आहे.