आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबांच्या शिर्डीची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नाशिकला होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता शिर्डीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. स्थानिक पोलिस, मंदिराची खासगी सुरक्षाव्यवस्था स्थानिक गुन्हे शाखा काटेकोर काळजी घेत आहे. रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने ३० पाकिटमारांना गजाआड केले.

शिर्डीच्या सुरक्षेकरिता बॅरिकेटस्, रेनकोट, क्रेन, जनरेटर, टॉर्च, रोप, फायबर स्टीक्स, बाँम्बशोधक अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह इतर साहित्य घेण्यासाठी १० कोटींचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने तयार होता. त्यापैकी २.६० कोटींचे साहित्य खरेदी करण्यास तत्काळ मंजुरी मिळाली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह बॉम्बशोधक टीम मिळावी, असा प्रस्तावही वरिष्ठांकडे पाठवलेला आहे. मंजुरी मिळालेल्या निधीमध्ये शिर्डीची सुरक्षा व्यवस्था काटेकोर करण्याकडे पोलिस प्रशासनाचा कल आहे.

पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी अलीकडेच शिर्डीच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. शिर्डीच्या सुरक्षाव्यवस्थेवर कडक नजर ठेवावी लागणार असून संस्थानच्या अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या सूचना मार्गदर्शनाखाली संस्थानच्या सुरक्षा अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षणही देण्यात आले. शिर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात श्रीसाईबाबा संस्थानच्या सुरक्षा अधिकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले.

सुरक्षेच्या अनुषंगाने एचएचएमडी, डीएफएमडी, बॉम्ब स्कॅनर या उपकरणांचा तपासणीत कसा वापर करावा, मानवी शरीराची तपासणी कशी करावी, बॉम्ब कसा ओळखावा, संशयित बेवारस बॅग किंवा वाहन कसे तपासावे, याविषयी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. शिर्डी मंदिर परिसरात नेमलेल्या २५ खासगी सुरक्षारक्षकांना राखीव पोलिस निरीक्षक भालचंद्र लवांदे यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या १२ बोअर बंदुकीतून फायरिंग कसे करावे, याचेही प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सुरक्षा कर्मचार्‍यांकडून सरावही करून घेण्यात आला.

पाकिटमार गजाआड
रविवारी स्थानिक गुन्हे शाखेने पाकिटमार भुरट्या चोरांविरुद्ध मोहीम राबवून ३० चोरट्यांना ताब्यात घेतले. अतिरिक्त अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दहा दिवसांपूर्वीच शिर्डीत ४४ भिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शनिशिंगणापूर मोहटादेवी परिसरातही अशीच कारवाई होईल.'' शशिराजपाटोळे, निरीक्षक.