आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार; शिवसेनेचे शशिकांत गाडे यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ऐन दुष्काळात सरकारकडून जिल्ह्याची हेळसांड होत आहे. जनावरांच्या छावण्या व रोजगार हमीच्या कामात हेळसांड होत आहेत. याबाबत शासनाने सुस्पष्ट धोरण त्वरित जाहीर करावे, छावण्यांमधील मोठय़ा जनावरांना पूर्वीप्रमाणे 80 रुपये अनुदान मिळावे; अन्यथा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या 22 जानेवारीच्या जिल्हा दौर्‍यात शिवसेना काळे झेंडे दाखवून निषेध करेल, असे शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

गाडे म्हणाले, जनावरांच्या छावण्यांबाबत शासकीय स्तरावर हेळसांड होत आहे. यापूर्वी छावणीत मोठय़ा जनावरांसाठी 80 रुपये अनुदान होते. आता ते 60 रुपये झाले आहे. त्यामुळे चालकांनी जनावरांचा खुराक बंद केला. जिल्ह्यातून छावण्यांचे 200 प्रस्ताव आले आहेत. त्याबाबत तातडीने विचार करावा. दुष्काळाची तीव्रता पाहता जिल्ह्यातील साखर कारखाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच बंद करावेत. शासनाने कारखाने बंद करण्याचे आदेश काढले नाही तर शिवसेनेला कारखाने बंद पाडण्याचा निर्णय घ्यावा लागेल. शासनाच्या धोरणामुळे गेल्या वर्षी जिल्ह्यातील 4 लाख पशुधन कमी झाले. रोजगार हमीच्या कामातही शासकीय पातळीवर उदासीनता आहे, असे गाडे म्हणाले.

पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही
प्रशासनावर अंकुश ठेवण्याची व काम करून घेण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते. आपल्या जिल्ह्यात मात्र पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक दिसत नाही. नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंदमध्ये पालकमंत्र्यांनी भेट देऊन छावणी सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासनाने त्याच दिवशी दुपारी त्या भागात पुरेसा पाऊस झाल्याचे कारण सांगून छावणी सुरु करायला नकार दिला. पालकमंत्र्यांच्या आदेशाला प्रशासन केराची टोपली दाखवते, हे सिद्ध झाले आहे, असे गाडे म्हणाले.