आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena BJP And Congress NCP Parties Election Issue At Nagar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुती-आघाडीतील जागावाटपाचा तणाव कायम, अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शिवसेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी हे राजकीय पक्ष जागावाटपावरून आपापसांत भांडत आहेत. यामुळे दोन्ही आघाड्यांवर स्वबळाचा नारा घुमत आहे. महायुती वा आघाडीचे सूत जुळलेले नाही. मात्र, जिल्ह्यात गुडघ्याला बाशिंग बांधून बसणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. मात्र, असे घडल्यास उमेदवारांची संख्या दुपटीने वाढणार आहे.

शिवसेना-भाजप महायुतीतील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. युती तुटण्याच्या चर्चेने शुक्रवारी (१९ सप्टंेबर) चांगलाच जोर धरला होता. जिल्ह्यातील बारांपैकी सात मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. यात नगर शहर, पारनेर, अकोले, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील नगर, पारनेर व कोपरगाव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. पक्षाने विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे धोरण यापूर्वीच जाहीर केले आहे. भाजपकडे पाच मतदारसंघ आहेत. यात जिल्ह्यातील दक्षिण भागातील चार, तर उत्तर भागातील एकमेव मतदारसंघ भाजपकडे आहे. श्रीगोंदे, कर्जत-जामखेड, पाथर्डी-शेवगाव, राहुरी व नेवासे या मतदारसंघांचा यात समावेश आहे. विद्यमान आमदारांच्या उमेदवारीबाबत पक्षाने अद्याप कोणतेही धोरण जाहीर केलेले नसले, तरी आमदार राम शिंदे व शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत जिल्ह्यातील बारापैकी पाच मतदारसंघ काँग्रेसकडे, तर सात मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत. नगर, कर्जत-जामखेड, शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर काँग्रेसकडे, तर उर्वरित मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत.

जागावाटपाचा तिढा ताणला जाऊन महायुती व आघाडीत बिघाडी झाल्यास जिल्ह्यात उमेदवारांची संख्या दुपटीने वाढणार आहे. अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीकडून दबावाचे राजकारण सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात महायुती व आघाडी होण्याची शक्यता जास्त आहे. तसे न झाल्यास चारही पक्षांकडे सर्वच मतदारसंघांत उमेदवारांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यादृष्टीने काही जणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या या इच्छुकांनी महायुती व आघाडी होऊ नये, यासाठी देव पाण्यात घालून प्रतीक्षा सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरी जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे या इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

अदलाबदल अटळ
बदलत्या परिस्थितीत युती व आघाडीकडून जिल्ह्यातील जागांमध्ये फेरबदल अटळ असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीने दक्षिणेतील कर्जत-जामखेड व नगरच्या जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. मात्र, या दोन जागांच्या बदल्यात दक्षिण भागातील इतर दोन जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अपेक्षित आहेत. युतीच्या जागांमध्ये अदलाबदलीची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.