आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना प्रवेश, पण विनाअट...महापौर निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी झालेल्या चार नगरसेवकांना पक्षात घ्या, पण त्यांची कोणतीही अट खपवून घेणार नाही, असा सूर शिवसेना नगरसेवकांनी लावला आहे. दरम्यान, सेनेत प्रवेश घेण्याचे नक्की असले, तरी सहकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी मंगळवारी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले.
मनसेच्या तिकिटावर दोनदा निवडून आलेल्या डागवाले यांची सेनेतील घरवापसी जवळपास निश्चित असली, तरी काही सेना नगरसेवकांनी मात्र विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भविष्यात सेनेत दुफळी निर्माण होण्याची शक्यता आहे.

अवघ्या सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आतापासूनच सज्ज झाली आहे. महापौरपदाच्या उमेदवारापासून अपेक्षित संख्याबळ जमवण्याचे प्रयत्न सेनेने सुरू केले आहेत. मनसेतून हकालपट्टी झालेले सध्या काँग्रेस आघाडीच्या छत्रछायेखाली असलेले नगरसेवक डागवाले, स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले, नगरसेविका सुवर्णा जाधव वीणा बोज्जा शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सेनेने त्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. प्रवेशाबाबत डागवाले आग्रही असले, तरी सेनेतील काही नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवर यांनी घेतलेल्या बैठकीत सेनेच्या नगरसेवकांनी डागवाले, भोसले यांच्या प्रवेशाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांना पक्षात घ्यायचे असेल, तर आम्ही त्यांची कोणतीही अट खपवून घेणार नसल्याचेही सेना नगरसेवकांनी ठामपणे सांिगतले. विनाअट प्रवेश करण्यास तयार असल्याचे डागवाले यांनी स्पष्ट केले असले, तरी त्यामागे त्यांचाच स्वार्थ आहे.

मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर निराधार झालेल्या डागवाले, भोसले, जाधव बोज्जा हे चारही नगरसेवक निराधार झाले आहेत. भविष्यात राष्ट्रवादीत सन्मानाची वागणूक मिळेल की नाही याबाबत या नगरसेवकांना शंका आहे. भाजपच्या मोदी लाटेची भरतीही आता कमी झाली आहे. काँग्रेस आपल्या पचनी पडणार नाही. त्यामुळे शिवसेना हाच एकमेव पर्याय असल्याचे मुरब्बी राजकारणी डागवाले यांनी ओळखले आहे. त्यामुळेच ते कोणतीही अट घालता सेनेत प्रवेश करण्यास तयार झाले आहेत. भोसले, जाधव, बोज्जा यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सेनेत प्रवेश करण्याचे नक्की झाले आहे. परंतु त्यासाठी आणखी थोडा वेळ हवा असल्याचे डागवाले यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले.

छत्रछायेतही उन्हाचा त्रास
मनसेच्यातिकिटावर दोनदा निवडून आलेले डागवाले गेल्या दीड वर्षापासून काँग्रेस आघाडीच्या छत्रछायेत जाऊन बसले आहेत. महापौर निवडणुकीत त्यांनी पक्षादेश धुडकावून राष्ट्रवादीला मदत केली. त्यामुळे मनसेने त्यांच्यासह इतर तीन नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली. आता पुढील राजकीय गणित मांडून डागवाले यांनी पुन्हा सेनेचा रस्ता निवडला. त्यांचा हा निर्णय कितपत योग्य आहे हे येणारा काळच ठरवेल. डागवाले मात्र आपण आतापासूनच शिवसैनिक असल्याची चुणूक दाखवत आहेत. नुकत्याच झालेल्या महासभेत त्यांनी भर सभागृहात महापौर अभिषेक कळमकर यांचा निषेध नोंदवला. यावरूनच डागवाले यांना काँग्रेस आघाडीच्या छत्रछायेत उन्हाचा त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले.

सेनेला दुफळीची भीती
किशोरडागवाले हे मूळचे शिवसैनिक आहेत. विद्यार्थी सेनेसह शिवसेना शहरप्रमुखपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. ते मनसेत गेल्याने त्यांच्या जागेवर अनेकांचे राजकीय पुनर्वसन झाले. आता डागवाले परत अाल्यास सेनेतील आपले वजन कमी होईल, अशी अनेकांना भीती आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रवेशास काही शिवसैनिकांनी विरोध केला. डागवाले यांचा प्रवेश झालाच, तर सेनेत दुफळी निर्माण होण्याची मोठी भीती अाहे, असे एका शिवसेना नगरसेवकाने नाव छापण्याच्या अटीवर सांगितले.
महापौरपदाचे दावेदार
-सुनीता फुलसौंदर
- सुरेखा कदम
-आशा बडे
-उषा ठाणगे
हे आहेत सेनेच्या वाटेवर
-किशोरडागवाले
-गणेश भोसले
- सुवर्णा जाधव
-वीणा बोज्जा
-बाळासाहेब बोराटे
- उषा ठाणगे

सन्मान मिळेल का?
डागवाले,भोसले, जाधव बोज्जा यांच्यासह राष्ट्रवादीचे बाळासाहेब बोराटे अपक्ष उषा ठाणगे हे नगरसेवक सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सेनेच्याच एका निष्ठावान पदाधिकाऱ्याने दिली. त्यामुळे सेनेला हत्तीचे बळ मिळून महापौरपदाचा मार्ग मोकळा होणार आहे. सहा-सात महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापौरपदाच्या या निवडणुकीत डागवाले भोसले यांना कितपत सन्मान मिळेल, याबाबत शंकाच आहे. त्यात डागवाले यांनी विनाअट सेना प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.