आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर धर्म आणि समाजासाठी काम केले. केवळ शिवसेना व मुंबईवरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांचे उपकार आहेत. त्यांच्या भगव्याला डाग लागू देऊ नका, असे आवाहन डोंगरगण येथील जंगले महाराज शास्त्री यांनी बुधवारी शिवसैनिकांना केले.
नगर-औरंगाबाद महामार्गावरील महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या नामकरण सोहळ्यात जंगले महाराज बोलत होते. ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनपा भवनाला ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे भवन’ असे नाव देण्यात आले. महापौर शीला शिंदे, उपमहापौर गीतांजली काळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर दीपक सूळ, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, भाजपचे ज्येष्ठ नेते सदाशिव देवगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
जंगले महाराज म्हणाले, अनेकांनी राजकारण केले, पण सर्वांचेच नाव रस्ते व इमारतीला मिळत नाही. केवळ समाजासाठी त्याग करणार्या व्यक्तीचेच नाव दिले जाते. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक होते. त्यांनी भगवा ध्वज हातात घेऊन आयुष्यभर धर्म आणि समाजासाठी काम केले. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रावर मोठे उपकार आहेत. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे काम करीत राहणे, हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली आहे.
शिवसैनिकांनी केवळ धर्म आणि पक्षाच्या नावावर उड्या मारू नयेत, तर बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणे वागावे. तसे झाले तरच शिवसेना टिकेल, असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना दिला. बाळासाहेबांनी हाती घेतलेला भगवा हे त्यागाचे प्रतीक आहे. या भगव्याला डाग लागेल, असे काम शिवसैनिकांनी करू नये. बाळासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे समाजासाठी त्याग करण्यास शिकले पाहिजे, असे जंगले महाराज म्हणाले.
यावेळी आयुक्त कुलकर्णी, उपमहापौर काळे, नगरसेवक शिवाजी लोंढे, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास ढमाले यांनी केले, तर मिलिंद वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.
समाजकारणच केले..
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यात सर्वांत आधी नगर महापालिका भवनाला देण्यात आले. आम्ही आतापर्यंत बाळासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे केवळ समाजकारणच केले. माझ्यानंतर येणार्या महापौरांनीही समाजकारणच करावे, स्वार्थ न पाहता समाजासाठी झटावे, अशी अपेक्षा महापौर शीला शिंदे यांनी व्यक्त केली.
धार्मिक बाबतीत नगर मागासलेले
धार्मिकबाबतीत नगर शहर राज्यात सर्वांत जास्त मागासलेले आहे. जवळच्या औरंगाबाद शहरात दर वर्षी 25 ते 30 धार्मिक कार्यक्रम होतात. नगर शहरात मात्र अशा कार्यक्रमांची वानवाच आहे. शहरात मठ, आर्शम, तसेच मोठय़ा मंदिरांची संख्या नाममात्रच आहे. हिंदू धर्म वृध्दिंगत करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जंगले महाराजांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.