आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena Mp Bhausaheb Wakchaure In Congress News, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाऊसाहेब वाकचौरेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश; शिवबंधनाचा धागा महिन्याभरातच तुटला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंगळवारी मुंबईत काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश केला. त्यांच्या काँग्रेस पक्षातल्या प्रवेशाने बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी बांधलेले शिवबंधनाचे धागे महिना उलटायच्या आतच कच्चे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे या प्रवेशात काही तांत्रिक अडचण येऊ म्हणून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 24 फेब्रुवारीला र्शीरामपूरमध्ये होणार्‍या जाहीर सभेत ही घोषणा केली जाईल.

खासदार वाकचौरे यांचा काँग्रेस प्रवेशाचा सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. गांधीभवनातील प्रदेशाध्यक्षांच्या दालनात झालेला हा कार्यक्रम अत्यंत गुप्त ठेवण्यात आला. शिर्डीमधून खासदारकीचे तिकीट देण्याचे आश्वासन वाकचौरे यांना देण्यात आले आहे. संसद अधिवेशन संपताचवाकचौरे खासदारकीचा राजीनामा देतील.

शिर्डी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले वाकचौरे 2009 मध्ये काँग्रेसमधून खासदारकीसाठी इच्छुक होते. त्यांच्या उमेदवारीसाठी स्वत: विखे पाटील हे त्यावेळी प्रयत्नशील होते. मात्र गेल्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यातला असूनही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडण्यात आला. त्यामुळे वाकचौरेंचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला. तरीही वाकचौरे यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळवून आठवलेंचा पराभव केला होता.

शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले भाऊसाहेब वाकचौरे हे बाळासाहेब विखे पाटील यांच्या जवळचे मानले जातात. विखे पाटील यांच्या मदतीच्या जोरावरच 2009 साली शिर्डी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. स्वत: बाळासाहेब विखे पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंना गळ घालत वाकचौरेंना तिकीट मिळवून दिल्याची जोरदार चर्चाही त्यावेळी केली जात होती. तसेच आता त्यांच्या काँग्रेसमधल्या प्रवेशातही विखे पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.

विजयासाठी विखे, थोरातांचे प्रयत्न
वाकचौरे यांच्या विजयासाठी विखे व थोरात प्रयत्न करणार आहेत. शिवाय वाकचौरे यांनी मतदारसंघात चांगली कामे केली आहेत. त्यामुळे विरोधात कोणताही उमेदवार असला, तरी त्यांचा विजय निश्चित असल्याचे काँग्रेसचे नगर शहराध्यक्ष ब्रिजलाल सारडा व विनायक देशमुख यांनी सांगितले.

जनसंपर्कामुळे पकड मजबूत
खासदार होण्यापूर्वी वाकचौरे शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य अधिकारी होते. नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली. नेवासे, संगमनेर, राहुरी येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी आधी काम पाहिले होते. नगर जिल्हा परिषदेत ते महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. जनसंपर्कामुळे त्यांची राजकारणातील वाटचाल वेगाने झाली. मागील वेळी ते शिवसेनेचे उमेदवार असले, तरी त्यांच्या विजयात माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा मोलाचा वाटा होता. मंगळवारी मुंबईला रवाना होण्याआधी वाकचौरे यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

शिवसेनेचे 3 खासदार फुटणार
शिवसेनेचे मराठवाड्यातील दोन आणि विदर्भातला एक असे तीन खासदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून त्यांचे काँग्रेस प्रवेश योग्य वेळी करवून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.