आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वखर्चाने पाणीपुरवठा केल्याचे सांगणा-या शिवसेना नेत्याचा टँकर एका दिवसातच गायब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - पठार भागात टँकरद्वारे पंधरा दिवस स्वखर्चाने पाणीपुरवठा केल्याचे सांगणा-या शिवसेना नेत्याचा टँकर एका दिवसातच गायब झाला. घाटात बंद पडलेला हा टँकर शेवटी बैलगाडीच्या साहाय्याने ओढत न्यावा लागला. या नेत्याचा टँकर केवळ प्रसिद्धीसाठी असल्याची टीका चौधरवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे. स्वपक्षातूनही टीका होत आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे यांनी स्वखर्चाने पंधरा दिवस टँकरद्वारे पाण्याच्या 150 खेपा केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल्याचे वृत्त अन्य काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले होते. टँकर सुरू करताना मोठा गाजावाजा व फोटोसेशन करण्यात आले होते.

चौधरवाडीच्या गीताराम पराड, सोपान दिघे, सुनीता दिघे, सूर्यभान दिघे, बबन बाळाजी दिघे, बजरंग पराड, लहानू दिघे, लता पराड, मीना दिघे आदी ग्रामस्थांनी या नेत्याची कृती चुकीची असल्याचे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राजकीय पोळी भाजण्यासाठी विरोधी पक्षातील कार्यकर्ते गावात येऊन विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे टँकर आणून लोकांची सहानुभूती मिळवणे होय. प्रत्यक्षात दुस-याच दिवशी टँकरचे पाणी बंद झाले, असे ग्रामस्थांनी सांगितले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शासकीय टँकर उपलब्ध करून दिले. तसेच त्यांनी तालुका दूध संघाचे टँकर पाठवले. त्यामुळे चौधरवाडीसह ठाकरवाडी, खरशिंदे, कौठे मलकापूर आदी गावांत पाण्याचे टँकर मिळू शकले, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. दरम्यान, पाणी मिळत नसताना कुटे यांनी कोणते आंदोलन केले? फ्लेक्स लावून लोकांना भुलवणारे साडेचार वर्षे कोठे होते, पक्ष बदनाम करण्यापेक्षा त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे यांनी केली.

केवळ द्वेषातून टीका
टँकरसंदर्भात पत्रक काढणा-या ग्रामस्थांनी माझ्यावर द्वेषातून टीका केली. चौधरवाडीचेच 100 लोक त्यांच्या सहीच्या पत्रकाने माझ्यावरील टीकेला लवकरच उत्तर देतील.’’
बाबासाहेब कुटे, शिवसेना तालुकाप्रमुख.