आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर निवडणूक: आघाडीतील'व्हिप'च्या घोळात शिवसेना जोरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापौर निवडणुकीत भाजपच्या गांधी गटाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत शिवसेनेची कोंडी केली असली, तरी काँग्रेसची भूमिका अद्याप संदिग्धच आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी करणाऱ्या गांधी गटासमोरच आता मोठा पेच निर्माण होणार आहे. एकीकडे आघाडी भाजपच्या गांधी गटाचा व्हिपचा घोळ सुरू आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने मनसेला बरोबर घेत मुसंडी मारली आहे. त्यातच काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, तर महापौर निवडणुकीसाठी पुन्हा एकतर्फी परिस्थिती निर्माण होणार आहे. दरम्यान, भाजपचे महानगराध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी िशवसेनेच्या बाजूने गेलेले भाजपचे गटनेते दत्ता कावरे यांना रविवारी रात्री शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (२१ जून) सकाळी ११ वाजता निवडणूक हाेणार अाहे. भाजपमधील गांधी गटाने काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत शिवसेनेसमाेर मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावला आहे. गांधी गटातील नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे गटनेता बदलण्यासाठी पत्र दिले आहे. परंतु मनपा प्रशासनाकडे भाजपचा गटनेता बदलण्यात आल्याचे काेणतेही अधिकृत पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही. त्यातच भाजपचे अधिकृत गटनेते दत्ता कावरे हेच असल्याचे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी आपण गटनेता असल्याची खोटी माहिती देत नगरसेवकांना बेकायदेशीर व्हिप बजावला असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. त्यामुळे गांधी गटात सध्या व्हिपचाच घोळ सुरू आहे. राष्ट्रवादीचे गटनेते समद खान यांनीदेखील नगरसेवकांना रविवारी व्हिप बजावला. परंतु राष्ट्रवादीने केलेल्या गटनोंदणीनुसार त्यांच्या नगरसेवकांसाठी हा व्हिप लागू होईल, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा उमेदवार नसताना हा व्हिप आम्ही का मानायचा, असा प्रश्न राष्ट्रवादीचे काही नगरसेवक उपस्थित करत आहेत. गांधी गट राष्ट्रवादीच्या या व्हिपच्या घोळात शिवसेनेने मात्र आपली व्यूहरचना पक्की केली आहे. मनसे नगरसेवकांना आपल्या बाजूने ठेवण्यात त्यांना यश आले आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी त्यांच्या नगरसेवकांना शिवसेनेबरोबर राहण्याचे आदेश दिले आहेत. मनसेच्या या आदेशामुळे गांधी गटात सामील झालेले किशोर डागवाले गणेश भोसले माघारी फिरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यातच काँग्रेस महाआघाडीत सहभागी होईल की नाही, याबाबत अद्याप संदिग्धताच आहे. त्यामुळे सध्यातरी शिवसेनेचेच पारडे जड आहे. सोमवारी होणाऱ्या हालचाली महत्त्वाच्या ठरतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

शिस्तभंगाची नोटीस
भाजपचेमहानगराध्यक्ष गांधी यांनी पक्षाच्या विरोधात वागल्याने दत्ता कावरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली. महापाैर निवडणुकीत भाजपचे नवीन गटनेते सुवेंद्र गांधी यांनी सांगितलेल्या उमेदवारास मतदान केल्यास तुमच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गांधी यांनी कावरे यांना दिला आहे.

जाधव, बोज्जा ठरले वरचढ
नेहमीिकंगमेकरची भूमिका बजावणारे मनसे नगरसेवक गणेश भोसले किशोर डागवाले यांची या निवडणुकीत चांगलीच अडचण झाली. त्यांना त्यांच्या पक्षातील नगरसेविका सुवर्णा जाधव वीणा बोज्जा या वरचढ ठरल्या आहेत. दोन्ही नगरसेविका महिनाभरापूर्वीच शिवसेनेच्या कंपूत दाखल झाल्या आहेत. त्यात मनसेप्रमुख ठाकरे यांनी त्यांच्या सर्व नगरसेवकांना शिवसेनेबरोबर जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे गांधी गटाच्या बाजूने असलेले डागवाले भोसले यांची चांगलीच अडचण झाली आहे. ते शिवसेनेत येण्यासाठी माघारी फिरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जातीयवाद्यांबरोबर नाही...
महापौरउपमहापौर निवडणुकीसंदर्भात अंतिम निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटी घेणार आहे. जातीयवादी पक्षांबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे रविवारी स्पष्ट केले. प्रदेशने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. निवडणुकीसाठी पक्षाने निरीक्षक नियुक्त केले आहेत. त्यांनी पक्षाच्या नगरसेवकांशी चर्चा करुन आढावा घेतला आहे. त्यानुसार प्रदेश काँग्रेस कमिटीचा निर्णय होईल, असे विखे यांनी या पत्रकात स्पष्ट केले आहे.

मनसेकडून शिवसेनेला भेट
महापौर निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितिन भुतारे, मनाेज राऊत आदींनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची रविवारी मुंबई येथे भेट घेतली. डफळ यांनी निवडणुकीतील सर्व परिस्थिती ठाकरे यांना सांगितली. त्यानुसार ठाकरे यांनी शिवसेनेबरोबर राहण्याचे आदेश त्यांच्या नगरसेवकांना दिले आहेत. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ठाकरे यांनी शिवसेनेला ही भेट दिली असल्याची माहिती डफळ यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. मनसेच्या या आदेशामुळे आधीच सेनेच्या बाजूने असलेल्या नगरसेविका सुवर्णा जाधव वीणा बोज्जा यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीच्या गटनेत्याचा जामीन फेटाळला
खुनाचाप्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला राष्ट्रवादीचा महापालिकेतील गटनेता समद खान याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने शनिवारी फेटाळला. मंगळवारी होणाऱ्या महापौर उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मात्र त्याला उपस्थित ठेवावे, असे आदेश न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायाधीश ए. जे. टिकले यांनी हा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल सरोदे यांनी काम पाहिले. समद खान सध्या सबजेलमध्ये असून त्याची सही असलेला व्हीप राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे यांनी नगरसेवकांच्या घरावर रविवारी लावले.
छायाचित्र: राष्ट्रवादीचे अभिजित खोसे यांनी रविवारी नगरसेवकांच्या घरावर पक्षादेश चिकटवले.
बातम्या आणखी आहेत...