आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन घडवा - शिवाजी कर्डिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान करून मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. तसेच परिवर्तन विधानसभा निवडणुकीत करा. विधानसभेमध्ये राहुरीचा आमदार कसा असेल हे दाखवून देण्याचे काम करेल, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातील मतदारांनी खासदार दिलीप गांधी यांना भरघोस मते देऊन विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी झालेल्या सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तर जिल्हा सेनाप्रमुख रावसाहेब खेवरे होते. यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, प्रमोद सुराणा, सेनेचे सर्जेराव घाडगे, भागवत मुंगसे व्यासपीठावर होते.
कर्डिले म्हणाले, आभार मानण्यास जरी उशीर झाला, तरी तालुक्याच्या विकासाला उशीर होणार नाही. देशात सर्वत्र मोदींचीच लाट होती, तरीही काँग्रेस - राष्ट्रवादी विरुद्ध जनतेच्या मनात जो राग होता त्याचा उद्रेक झाला. कारण देशात वाढलेला भ्रष्टाचार, महागाई, घोटाळे, महिला असुरक्षित होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये वाढलेली मग्रुरी व मस्ती निवडणुकीत जनतेने उतरून टाकली आहे. जनतेने मोदींच्या हाती सत्ता दिली.

मागील 50 वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती व जे 25 वर्षे सलग आमदार होते, त्यांना मतदारांनी हिशेब विचारला पाहिजे. 25 वर्षांत तालुक्यात रस्ते झाले नाहीत. पिण्याचे पाणी मिळत नाही. एसटी डेपोचा प्रश्न सुटलेला नाही. एमआयडीचा प्रश्न प्रलंबित असताना ताब्यातील संस्थांचेही वाटोळे ज्यांनी केले त्यांच्या ताब्यात साखर कारखान्याची सत्ता देऊनही कामगारांना पगार मिळाला नाही. कर्ज झाले. एकेकाळचा चांगला असलेला कारखाना कोट्यवधीने कर्जबाजारी झाला. हा कारखाना कर्जबाजारी का व कसा झाला याचा हिशेब द्या. मग 200/400 कोटींचे कर्ज घ्या. कामधेनू वाचली पाहिजे, तेथे राजकारण करायचे नाही, असे सांगत डॉ. तनपुरे कारखान्याचे साहित्य प्रसाद शुगरला जात आहे. यावर शिवाजी गाडे काहीही बोलत नाहीत, अशी टीका आमदार कर्डिले यांनी केली.

मागील 5 वर्षांत मी तालुक्यात चांगले काम केले आहे. राज्यात युती सत्तेवर आल्यावर तालुक्याचा कायापालट करू, असे आश्वान कर्डिले यांनी यावेळी बोलताना दिले.
यावेळी आसाराम ढूस, प्रकाश पारख, साहेबराव म्हसे, सुवेंद्र गांधी, बाळासाहेब गाडे, सर्जेराव घाडगे, नानासाहेब गागरे, किशोर गुंदेचा, वैभव मुळे यांचीही भाषणे झाली. सभेला भागवत मुंगसे, पोपट शिरसाठ, डॉ. संजय म्हसे, राजेश उपाध्ये, सुभाष वराळे, विजय बानकर, योगेश देशमुख, निसार शेख, श्रीकांत छिंदम, बापूसाहेब वराळे, अण्णासाहेब शेटे, सुकुमार पवार, कडूभाऊ म्हसे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष गायकवाड यांनी केले.