आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्डिलेंच्या जामीन अर्जावर आज निर्णय

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अशोक लांडे खूनप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिलेंचा जामीन अर्ज मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिल फटाले यांच्यासमोर सादर करण्यात आला. त्यावर दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवण्यात आला.
या प्रकरणाचा तपास दोन आठवड्यांत पूर्ण करून नगरच्या सत्र न्यायालयात कर्डिलेंविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे सरकारी पक्षातर्फे 24 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद खंडपीठात सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी कर्डिलेंना जामीन देण्यास नकार दिला. खंडपीठाचा रोख पाहून कर्डिलेंच्या वकिलांनी याचिका मागे घेतली, परंतु मंगळवारी कर्डिलेंचा जामीन अर्ज अ‍ॅड. अवतार सिंग यांनी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अनिल फटाले यांच्यासमोर सादर केला. त्यावर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विकास बडे व अ‍ॅड. सिंग यांनी युक्तिवाद केला.
अ‍ॅड. सिंग म्हणाले, कर्डिलेंविरुद्ध कलम 214 नुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या कलमान्वये आरोपीस सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 167 (2) नुसार आरोपी जेलमध्ये असताना दहा वर्षांच्या आत शिक्षा असणा-या गुन्ह्यांबाबत 60 दिवसांमध्ये दोषारोपपत्र दाखल करणे पोलिसांना बंधनकारक असते, परंतु कर्डिलेंवर अद्यापही दोषारोपपत्र दाखल करण्यात न आल्याने त्यांचा जामीन मंजूर करावा.
अ‍ॅड. बडे म्हणाले, कर्डिलेंवर कलम 214 नुसार गुन्हा दाखल असला, तरी तो या गुन्ह्यातील खुनाच्या (302) गुन्ह्याशी निगडित असून यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आहे. तसेच अशा गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या आरोपीविरुद्ध 90 दिवसांमध्ये दोषारोप सादर करता येऊ शकते. अशा परिस्थितीत आरोपीस जामीन देऊ नये.