आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पाथर्डी - तुमचे उद्योग मला माहिती आहेत, कुंडल्याही माझ्याकडे आहेत. मला तुम्ही खोट्या गुन्ह्यात अडकवून संपवायचे कारस्थान रचले. युतीचे राज्य येणारच आहे. तुम्हाला खर्या गुन्ह्यात अडकवून तुमचे खरे रूप जनतेला दाखवावे लागेल, अशी टीका करून विरोधी आमदारांच्या मतदारसंघात दहशतीचे वातावरण, बनवाबनवी आता खपवून घेणार नाही, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी माजी आमदार राजीव राजळे व प्रसाद तनपुरे यांना नाव न घेता दिले.
तालुक्यातील देवराई येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी आमदार दगडू बडे, ज्येष्ठ नेते अशोक गज्रे, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे, विक्रम ससाणे, माजी नगराध्यक्ष अँड. दिनकर पालवे, अशोक चोरमले, विष्णुपंत ढाकणे आदी उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यांपासून कर्डिलेंविरुद्ध राजळे-तनपुरे असे टीकायुद्ध सुरू आहे. निवडणुकीपूर्वीच राहुरी विधानसभा मतदारसंघात राजकीय हवा तापली आहे. कर्डिले म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून शेतकर्यांना दबावात घेत किरकोळ थकबाकीची कारणे दाखवत पाणी योजनांचे कनेक्शन कट करायचे, आम्ही तुमचे वाली आहोत, असे भासवत पुन्हा जोडून घेत कौतुक सोहळे आयोजित करायचे. खरेच थकबाकी वसुली करायची असेल, तर त्यांच्या ताब्यातील कारखाने, विविध संस्थांच्या बाकी वसुली करा. पेपरबाजी करणे हेच एक काम त्यांना चांगले जमते. युती शासनाच्या काळात मंजूर योजनांचा गाजावाजा आता करणे थांबवा. तुम्ही काय दिवे लावले ते सांगा? खासदार दिलीप गांधी-आमदार कर्डिलेंचे कौतुक सहन न होऊन सत्तेचा वापर करून विकासकामांमध्ये अडथळा आणणार्यांना अद्दल घडवू. यंदाचे वर्ष देशात व राज्यात परिवर्तनाचे आहे. मोदींशिवाय मतदार कोणाचेही ऐकून घेत नाहीत. स्वप्न पाहून आमदार-खासदार होता येत नाही, त्यासाठी जनतेत राहावे लागते, अशी टीकाही त्यांनी केली. अन्न सुरक्षा योजना, वीजबिल, दरकपात या केवळ फसव्या घोषणा आहेत. दोन्ही काँग्रेसवाले जर पुन्हा सत्तेत आले, तर अशा योजना बंद होणार आहेत. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी, तर मुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांना सत्तेवर आणल्याशिवाय वीज, पाणी व इतर प्रश्न मार्गी लागणार नाहीत, असा विश्वास कर्डिले यांनी सोमवारी व्यक्त केला.
प्रास्ताविक अनिल पालवे यांनी केले. यावेळी देवराई, त्रिभुवनवाडी, घाटशिरस, करंजी, कौडगाव येथील कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश पालवे यांनी केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.