आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींचा पुतळा चौकातच उभारावा; अन्यथा आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - छत्रपतीशिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच उभारला जावा; अन्यथा मोठा संघर्ष उभारला जाईल, असा इशारा हिंदू रक्षा कृती समितीतर्फे पत्रकार परिषदेत बुधवारी देण्यात आला. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आलेल्या शिल्पकारांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. मात्र, जागा ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करूनच निश्चित केली जाईल, असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, भाजप, शिवसेना, रिपाइं, शिवसंग्राम, शिवप्रतिष्ठान, भिमशक्ती, जयभवानी मित्रमंडळ, भगतसिंग मित्रमंडळ आदींनी एकत्र येत विजय जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली हिंदू रक्षा समितीची स्थापना केली आहे.

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देवकर म्हणाले, पालिकेतील सत्ताधारी केवळ धार्मिक तेढ वाढवण्यासाठी धर्माचे राजकारण करत आहेत. आजपर्यंत त्यांनी त्यामुळेच सत्ता मिळवली. आता निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी ही शक्कल लढवली आहे. शिवाजी महाराजांचा डॉ. आंबेडकरांचा पुतळा हा राजकीय स्टंट असून केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठी हे राजकारण केले असल्याचा आरोप त्यांनी केला.

जैस्वाल म्हणाले, महाराजांचा पुतळा सर्व हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी गेली ३० वर्षे आंदोलन केल्यानंतर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आता मंजुरी दिली. मात्र, त्यातही जागेचा वाद उभा केला. शिवाजी चौकात पुतळा बसवण्यास कुठल्याही धर्माच्या लोकांचा विरोध नसताना केवळ राजकारणासाठी हा खोडा घातला जात आहे. शिवाजी चौकातील जागेसाठी कुठल्याही पातळीवर संघर्ष करावा लागला, तरी मागे हटणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

रिपाइंचे सुभाष त्रिभुवन यांनी डॉ. आंबेडकर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पालिकेचे अभिनंदन केले. मात्र, पुतळ्याची जागा बदलण्याचा प्रयत्न केल्यास रिपाइं आंदोलनात उतरेल, असे ते म्हणाले. यावेळी गौरव कांबळे, कुणाल करंडे, दत्तू कांदे, सुदर्शन शितोळे आदींची भाषणे झाली. भाजपचे शहराध्यक्ष मारूती बिंगले, बबन मुठे, गणेश राठी, राजेंद्र पवार, राजेंद्र पठाडे, राजेंद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.

महाराजांसाठी अतिक्रमण झाल्यास बिघडते कुठे?
शिवाजीचौकात अतिक्रमणाच्या नावाखाली शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास विरोध करणाऱ्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांनीच शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे केली आहेत. ती आधी काढावीत. हडकोच्या नावाखाली गरिबांची अतिक्रमणे उठवून मिळवलेली जमीन हडप केली. मग शिवाजी महाराजांसाठी थोडेसे अतिक्रमण झाल्यास बिघडते कुठे, असा प्रश्न शिवसेनेचे राजेंद्र देवकर यांनी केला.