आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणातील युवकांचा सहभाग आशादायक : नागवडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - युवक मोठ्या प्रमाणात राजकारणात येत आहेत. लोकशाही मजबूत होण्यासाठी युवकांचा वाढता सहभाग निश्चितच आशादायक आहे. मात्र, या युवकांनी राजकारणाकडे धंदा म्हणून न पाहता सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पाहावे, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
नागवडे गुरुवारी 79 व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने मंगळवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांच्या अभीष्टचिंतनाचा समारंभ बेलवंडी येथे होत आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना नागवडे यांनी आजपर्यंतच्या राजकीय व सामाजिक प्रवासाबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. पूर्वी राजकारणात केवळ निवडणुकीपुरते तात्त्विक मतभेद असायचे. मात्र, गेल्या काही वर्षांत निवडणुका व राजकारणाचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे, असे ते म्हणाले.
जि. प. निवडणुकीविषयी ते म्हणाले, कुणी कितीही आव आणला तरी जिल्ह्यासह श्रीगोंद्यात काँग्रेसचेच स्पष्ट बहुमत होईल. आमदारांइतकेच अधिकार आता जि. प. सदस्यालाही मिळाल्याने ग्रामविकासाला बळकटी मिळाली आहे, पण त्याकरिता प्रश्न समजून त्याचे विकासकामांत रूपांतर करणारा सदस्यही तेवढाच सक्षम असणे आवश्यक आहे. युवकांचे राजकारणातील वाढते आकर्षण आशादायक असले, तरी थेट निवडणुकीत उतरण्यापूर्वी समाजातील घटक म्हणून त्यांनी काम करणे आवश्यक असल्याचे नागवडे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस मजबूत ठेवण्यासाठी सत्तेपेक्षा पक्षनिष्ठेलाच प्रत्येकाने महव दिले पाहिजे. रचनात्मक कामाला प्राधान्य द्यावे. श्रीगोंद्यात नव्याने काँग्रेस प्रवेश करणा-या प्रमुख कार्यकर्त्यांमुळे पक्षाची व्यापकता वाढून निश्चितच बळकटी वाढेल, असे नागवडे म्हणाले.