आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना-राष्ट्रवादीचा ‘महावितरण’मध्ये गोंधळ, पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरात गेल्या काही दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. कोणतीही पूर्व सूचना देता शहराच्या विविध भागात सहा ते सात तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेने मोर्चा काढून, तर राष्ट्रवादीने गेटबंद आंदोलन करून महावितरणच्या अधिकाऱ्यांना भारनियमनाबाबत बुधवारी जाब विचाराला. दरम्यान, पोलिसांनी धरपकड करत आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या दडपशाही विरोधात शिवसेनेने कोतवाली पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले. 
 
ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन सुरू करण्यात आल्याने नगरकर त्रस्त झाले आहेत. भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर करता महावितरण कार्यालयाने भारनियमन सुरू केले. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय सुरू आहे. भारनिमनच्या विरोधात शिवसेनेने उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली महावितरणवर मोर्चा काढला. अधीक्षक अभियंता अनिल बाेरसे यांच्या कार्यालयातील दिवे पंखे बंद करून शिवसेनेच्या कार्यकत्यांनी तेथे ठिय्या मांडला. याच वेळी राष्ट्रवादीचे अविनाश घुले, संपत बारस्कर, कुमार वाकळे, प्रा. माणिक विधाते यांच्यासह कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाचे गेट बंद करून आंदोलन सुरू केले. दोन्ही आंदोलने एकाच वेळी सुरू झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महावितरणचा निषेध नोंदवला. या गोंधळात महावितरणचे कामकाज तीन-चार तास बंद होते. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांची धरपकड सुरू केली. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत कोतवाली ठाण्यात आणले. 

दरम्यान, पोलिसांच्या या दडपशाही विरोधात शिवसेनेने कोतवाली पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. जबरदस्तीने ताब्यात घेणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा राठाेड यांनी दिला. तोपर्यंत पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी मध्यस्ती करत पोलिसांच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, गणेश कवडे, विक्रम राठोड, अनिल बोरूडे, योगिराज गाडे, दिगंबर ढवण, दत्तात्रय मुदगल आदी उपस्थित होते. 
 
वीजपुरवठा खंडित होऊ देणार नाही 
शिवसेनेनाराष्ट्रवादीने भारनियमनाविरोधात तीव्र आंदोलन केले. परंतु दोन्ही पक्षांच्या हातात काहीच पडले नाही. भारनियमनाच्या व्यतिरिक्त शहरातील वीजपुरवठा खंडीत होऊ देणार नाही, तसेच तुमच्या भावना मुख्य कार्यालयाला कळवू, असे लेखी पत्र अधीक्षक अभियंता बोरसे यांनी शिवसेनेला दिले. यावरूनच शहरात सुरू असलेले भारनियमन पुढील काळातही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होते. नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळीत या भानियमनाला तोंड द्यावे लागणार आहे. 
 
मंत्र्यांशी फोनाफोनी 
शिवसेनेच्याआंदोलकांना कोतवाली पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी तेथेच ठिय्या दिला. दडपशाही करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा राठोड यांनी दिला. दरम्यान, याच वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम, दीपक केसरकर आदी मंत्र्यांशी फोनाफोनी करून पोलिसांवर दबाव आणला. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांनी कोतवाली ठाण्यात येत दिलगिरी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...