आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्यापूर्वी कर्जमाफी द्या; शिवसेनेची निदर्शने, भाजपला घरचा आहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दसऱ्याच्या सणापूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जोरदार घोषणाबाजीदेखील केली. दरम्यान, राज्यात सत्तेत सहभागी शिवसेनेने कर्जमाफीसाठी आंदोलन करुन भाजपला घरचा आहेर दिला आहे. 
 
खासदार सदाशिव लोंखडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, रफिक शेख, प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, शरद झोडगे, संदीप खामकर, गुलाब शिंदे, विश्वास जाधव, लक्ष्मण धसाळ, विठ्ठल काळे, पोपट निमसे, माणिक लोंढे, भागीनाथ गवळी, संजय शिंदे, विजय काळे, गणेश सोमवंशी, संजय फंड, देविदास सोनवणे, भास्कर मोटकर,अमोल गायके आदी यावेळी उपस्थित होते. 
 
शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभय महाजन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज दसऱ्यापूर्वी माफ करून कर्जाची रक्कम त्यांच्या बँकखात्यात जमा होणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ऐतिहासिक वगैरे असल्याचे ढोल पिटले गेले. मात्र, ऐतिहासिक अमंलबजावणी कधी होणार याची वाट पाहून बळीराजा थकला आहे. कर्जमाफी जाहीर होऊन तीन-चार महिने झाले. त्याच्या अंमलबजावणीचे अनेक वायदे या काळात शासनाने केले, पण वायदा ना फायदा अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. 

कर्जमाफीची अंमलबजावणी दसऱ्यापूर्वी करून शेतकऱ्यांना आनंदाचे सोने लुटू द्यावा, असा आग्रह शिवसेनेने धरला. कर्जमाफीसाठी अनेक आंदोलने करून आता अंमलबजावणीसाठीही बळीराजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. शेतकरी कर्जमाफी हे सर्वात मोठे शुभकार्य आहे. त्यामुळे दसरा सणाच्या मुहूर्तावर कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा होईल, यासाठी प्रयत्न व्हावेत. मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम बँकखात्यात जमा करा, असे निर्देश सरकारी यंत्रणांना दिले. मात्र, कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख सुरू आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
 
हा केवळ इशारा आहे 
दसऱ्याच्या सणापूर्वी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहे. मात्र, सेतू कार्यालयातील गोंध‌ळामुळे हे अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यावर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात येत असून, हे आंदोलन केवळ सरकारला इशारा आहे.
- सदाशिव लोंखडे, खासदार 
बातम्या आणखी आहेत...