आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी- शिवसेनेचे शिर्डी येथील विद्यमान शहराध्यक्ष सचिन कोते व माजी अध्यक्ष नानक सावंत्रे यांच्यात व्यासपीठावर बसण्यावरून बाचाबाची आणि नंतर तुफान मारामारी झाली. त्यात दोघांनाही जबर मार लागला. सावंत्रे यांनी कशीबशी सुटका करीत शेतात पळ काढला.
शिर्डी येथील सम्राट लॉन्सवर रविवारी उत्तर जिल्हा शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते व संपर्कप्रमुख सुहास सामंत उपस्थित होते. शिवसेनेच्या येथील दोन गटांत वाद आहेत. सामंत यांना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा पदच्युत गटाने पूर्वीच दिला होता. त्यामुळे मेळाव्यात संघर्ष होण्याची चिन्हे होती. मेळाव्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पदच्युत गट जाब विचारण्यासाठी मेळावा स्थळाकडे निघाला असता पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे तणाव वाढला.
नेमके काय घडले- व्यासपीठावर बसण्यावरून शहराध्यक्ष सचिन कोते व माजी अध्यक्ष नानक सावंत्रे यांच्यात बाचाबाची सुरू झाली. सावंत्रे यांना व्यासपीठावर बसू देण्यास हरकत घेण्यात आली. त्यामुळे वातावरण चिघळले. बाचाबाचीचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले. मारामारीत कोते व सावंत्रे दोघांच्या डोक्याला मार लागला. या प्रकाराने मोठा गोंधळ उडाला. घटनेनंतर सावंत्रे उसाच्या शेतात पळाले. जमाव त्यांच्यामागे पळाला.
कार्यकर्ते झिंगलेले !- झालेल्या प्रकाराने सामंत संतापले होते. 'बरेच शिवसैनिक येथे दारू पिऊन आले आहेत', असे सांगत त्यांनी शिवसेनेत शिस्त महत्त्वाची आहे, असे खडसावले. नगर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती तीव्र आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असताना जनता दुष्काळात होरपळत आहे, असे सामंत म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.