आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काट्याकुट्यांतून पायवाट तुडवणाऱ्या मुलांच्या पायात शूज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- काट्याकुट्यांतून पायवाट तुडवत वाड्यावस्त्यांतून शाळेची अनवाणी पायरी चढणाऱ्या गिऱ्हेवाडी येथील आदिवासी भागातील ९१ विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या माध्यमातून शूज देण्यात आले. ज्यांच्या पायाला कधी चप्पल माहिती नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पायात शूज चढवल्यानंतर त्यांचा आनंद आेसंडून वहात होता. एकमेकांकडे हरखून पाहणाऱ्या या मुलांच्या जीवनात नवा आनंद रोटरीने निर्माण केला. 


संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अनेक शाळा अतिदुर्गम समजल्या जातात. या शाळांवर जाण्यासही शिक्षक फारसे उत्सुक नसतात. मात्र, या शाळांवरील काही शिक्षक आपला सेवाभाव जपत शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडत असतात. संगमनेरच्या रोटरी क्लबने मदतीसाठी अशीच गिऱ्हेवाडी येथील शाळा निवडत तेथील मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. 


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने सुरू झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना शाळेतील मुलींनी स्वत:च्या हातांनी तयार केलेले पुष्पगुच्छ भेट देत सुखद धक्का दिला. रोटरीचे अध्यक्ष भारतभूषण नावंदर, प्रकल्प प्रमुख डॉ. विनायक नागरे, सचिव समीर शाह, पवन वर्मा, शाळा व्यवस्थापन समितीचे सोमनाथ भुतांबरे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी शैलजा सामलेटी, विस्तार अधिकारी शिवाजी वाघ, केंद्रप्रमुख पुनाजी धांडे, मुख्याध्यापक कृष्णा गवारे सोमनाथ मदने आदी यावेळी उपस्थित होते. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मदत करणे हे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करत त्यांना शूज उपलब्ध करून देण्याची संधी यानिमित्ताने मिळाल्याचे सांगताना रोटरीचे डॉ. नागरे यांचे अश्रू अनावर झाले.

 

या शाळेतील मुलांच्या वैद्यकीय मदतीसाठीदेखील सहकार्य करण्याचे आश्वासन रोटरीचे अध्यक्ष भारतभूषण नावंदर यांनी दिले. सचिव समीर शाह, पवन वर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. रोटरीच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. रोटरीच्या माध्यमातून आमच्या मुलांच्या पायात शूज दिसू लागल्याचे तुकाराम भगत या पालकाने सांगितले. प्रास्ताविक गणेश सांगळे यांनी केले, तर आभार अशोक शेटे यांनी मानले. 

बातम्या आणखी आहेत...