आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय मुंबई लघुपट महोत्सवात नगरच्या फिल्मस् झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मुंबईत १८ डिसेंबरला होणाऱ्या युनिव्हर्सल मराठीच्या तिसऱ्या माय मंुबई लघुपट महोत्सवात शेवगावच्या उमेश घेवरीकर यांचा दोरी, फिरोझ काझी यांचा द रिअल इंडियन, माफिज इनामदार यांचा सफाई की पाठशाला, तसेच नगरच्या श्याम शिंदे यांचा अव्यक्त लघुपट प्रदर्शित होणार आहे.
शॉर्टफिल्म म्हणजे चित्रसृष्टीचे दार उघडणारी जणू गुरूकिल्लीच. लेखक, दिग्‍दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांची प्रतिभाशक्ती पणाला लावणारे हे माध्यम आहे. सामाजिक समस्या, नवीन कथा, कल्पना कॅमेराबद्ध करून सृजनशील शॉर्टफिल्मची निर्मिती करणाऱ्या शॉर्टफिल्म मेकर्ससाठी माय मुंबई लघुपट महोत्सवाचे आयोजन युनिव्हर्सल मराठी व सांस्कृतिक कार्य कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून मुंबईत पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे १८ डिसेंबरला हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवासाठी प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत.
देश-विदेशांतून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदा या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शॉर्ट फिल्म शो केस या टीव्ही शोच्या माध्यमातून मनोरंजन, प्रबोधन व जनजागृतीचे मूल्य जपत या महोत्सवाने राष्ट्रीय पातळीवर एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या महोत्सवासाठी सामाजिक जनजागृती (सोशल अवरनेस), अॅनिमेशन, मोबाइल शूट फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्मस) आणि आंतरराष्ट्रीय लघुपट (इंटरनॅशनल शॉर्टफिल्म) अशा वर्गवारी करण्यात आली आहे. त्यासाठी विनामूल्य प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख २५ नोव्हेबर आहे. या महोत्सवास नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते-दिग्‍दर्शक विजय पाटकर व लेखक-दिग्दर्शक शंतनू रोडे (जयजयकार, बाबु बँड बाजा) या दिग्गजांची महोत्सवाला उपस्थिती असेल. महोत्सवात सहभागी झालेल्या लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जाईल. विजेत्यांना रोख रकमेसहीत पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. यावेळी शॉर्टफिल्म मेकर्ससाठी तज्ज्ञांकडून खास मार्गदर्शन, चर्चा, तसेच प्रश्नोत्तराची संधी मिळणार आहे, अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३, ९८३३०७५७०६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या महोत्सवात उमेश घेवरीकर, फिरोझ काझी, माफिज इनामदार, श्याम शिंदे यांच्यासह नगरच्या न्यू आर्टस्् महाविद्यालयातील संज्ञापन विभागातील विद्यार्थीही सहभागी होतील.