आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shortage Meeting : Pantangrao Ignoring Common Man ,but Pay Attention His Officers

टंचाई बैठक : जनतेच्या व्यथांकडे पतंगराव कदमांचे दुर्लक्ष;मात्र अधिका-यांची पाठराखण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ‘पावसाने झोडपले आणि राजाने मारले’ तर दाद मागायची कुणाकडे, असाच काहीसा प्रकार वनमंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी झालेल्या टंचाई आढावा बैठकीत घडला. दुष्काळाने होरपळलेल्या जिल्ह्यातील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीला हजेरी लावून मोठय़ा अपेक्षेने मंत्रिमहोदयासमोर आपल्या व्यथा मांडल्या. परंतु मंत्रिमहोदयांनी त्यांचा अपेक्षाभंग करून अधिकार्‍यांचीच पाठराखण केली. त्यामुळे बैठकीला हजेरी लावणार्‍या अनेकांच्या पदरी केवळ निराशाच पडली.

वेळ दुपारची, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात हळूहळू गर्दी वाढत गेली. प्रत्येकजण आपापल्या भागातील अडचणी व अधिकार्‍यांच्या मुजोरीबाबत तक्रार करण्यासाठी मंत्री महोदयांची प्रतीक्षा करीत होता. तब्बल एक तास उशिरा आलेले मंत्रिमहोदय कदम यांनी घाईतच बैठक सुरू केली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार चंद्रशेखर घुले, भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार शिवाजी नागवडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपाध्यक्ष मोनिका राजळे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच छावण्या तसेच टँकरचे वाटप करताना मोठय़ा प्रमाणात राजकारण होत असल्याच्या तक्रारी काही पदाधिकार्‍यांनी उपस्थित केल्या. जिल्हाधिकार्‍यांसह काही अधिकारी राजकीय दबावाला बळी पडत असल्याचेही कदम यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. शासनाच्या नरेगा योजनेचा जिल्ह्यात मरेगा झाला आहे, त्यामुळे ही योजना बंद करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी केली. पाथर्डी तालुक्यात रोजगार हमीच्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी पाथर्डीचे पांडुरंग खेडकर यांनी केली. तर श्रीगोंद्याच्या पाणीवाटपात पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्यामुळे मोठय़ा प्रमाणात राजकारण होत असल्याचे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले. विसापूर गावाला मागील वर्षापासून जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. ज्या गावात काँग्रेसला मतदान झाले, अशा अनेक गावांना जाणीवपूर्वक पाण्यापासून डावलण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्व परिस्थिती माहिती असूनही अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेतात. जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली, तर त्यांच्याकडूनही काहीच कार्यवाही होत नसल्याचे नाहाटा यांनी कदम यांच्या निदर्शनास आणून दिले.

कर्जत, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, अकोले आदी तालुक्यांतील नागरिक व पदाधिकार्‍यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. अनेकांनी सरळ अधिकार्‍यांकडे बोट दाखवले, काहींनी तर थेट नावानिशी अधिकार्‍यांच्या तक्रारीही केल्या. मंत्रिमहोदयांनी मात्र चक्क मवाळकीची भूमिका घेऊन एकाही अधिकार्‍याची साधी कानउघाडणी देखील केली नाही. तक्रारींना उत्तर देताना त्यांनी केवळ ‘होय बा’चे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी आपली नाराजीही व्यक्त केली. मंत्रिमहोदयांना मात्र त्याच्याशी काहीच देणेघेणे नव्हते. त्यांना केवळ लवकरात लवकर बैठक आटोपती घेऊन निघायचे होते, झालेही तसेच त्यामुळे मोठय़ा अपेक्षेने तक्रारी घेऊन आलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला.

विखे-थोरातांची दुसरी बैठक
वनमंत्री पतंगराव कदम यांची आढावा बैठक संपल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सायंकाळी 6 वाजता पुन्हा आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे या दुसर्‍या स्वतंत्र आढावा बैठकीची गरज नव्हती, अशी कबुलीही थोरात यांनी बैठकीत दिली. यावेळी थोरात यांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. श्रीगोंद्यातील पाण्याचे राजकारण ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व सूचना
* पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
* जिल्ह्यातील पाझर तलाव भरावेत
* तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार
* टँकरसाठी 10 टक्के वाढीव लोकसंख्या गृहीत धरणार
* मजुरांना रोजगार हमीचे पैसे 15 दिवसांत द्यावेत
* 10 मजुरांनाही मिळणार काम
* पाण्याचे नवीन उद्भव शोधावेत
* पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकार्‍यांना 25 लाखांपर्यंतचे अधिकार
* टंचाईग्रस्त गावांच्या पाणी योजनांसाठी 67 टक्के सबसिडी