आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shortcut Earning Take Many Victims In Nagar Taluka

नगर तालुक्यात कमाईच्या ‘शॉर्टकट’ने गेले अनेक बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शेती हा पारंपरिक व्यवसाय असला, तरी त्यात कष्टाचेच काम अधिक. त्यापेक्षा लष्कराच्या युद्धसराव परिसरात छुप्या पद्धतीने घुसखोरी करणे, तेथे ‘मूल्यवान’ भंगार गोळा करणे अन् ते काळ्या बाजारात विकून अल्पावधीत बक्कळ पैसा कमावणे, हा ‘फंडा’च नगर तालुक्यातील ‘खारे कर्जुनेकरां’च्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या 50 वर्षांत याच ‘शॉर्टकट’ने किमान 30 जणांचा बळी घेतला, अनेकजण कायमचे जायबंदी झाले. तथापि, पैसे कमावण्याच्या ‘शॉर्टकट’चा मोह काही सुटत नाही. बुधवारी दारुगोळ्याच्या स्फोटात झालेल्या युवकाच्या मृत्यूने हे कटूसत्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

अविनाश ऊर्फ अनिल यशवंत पातारे (23) या युवकाचा बुधवारी मृत्यू झाला, तर हौसाबाई बाजीराव तांबे (52) ही महिला गंभीर जखमी झाली. गुरुवारी दुपारी हौसाबाईला पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे अवघे 3 हजार 200 लोकसंख्या असलेले खारे कर्जुने गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे गाव, अशी या गावाची ओळख. आशिया खंडातील सर्वांत मोठे युद्धसराव क्षेत्र असलेल्या लष्कराच्या के. के. रेंजलगतच हे गाव आहे. युद्धसरावात डागलेल्या तोफगोळ्यांचे भंगार गोळा करण्याचा या गावातील अनेकांचा बेकायदेशीर उद्योग आहे.

इंग्रजांच्या काळात सर्वांत जास्त महसुली कर भरणारे गाव अशी या गावाची ओळख होती. गेल्या वर्षी गावाला पावणेचार लाख रुपयांचा तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला. स्वातंत्र्यानंतर 1961 मध्ये गावालगतची जमीन लष्कराने युद्धसरावासाठी अधिग्रहित केली. त्यावेळी गावाची लोकसंख्या हजारच्या आसपास होती. गावातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय शेती असला, तरी अनेकजण नागापूर एमआयडीसीत कामाला जातात. काहीजण युद्धसराव क्षेत्रात लष्कराचा ठेकेदार असतानाही घुसखोरी करून दारुगोळ्याचे भंगार गोळा करतात. भंगारातील दारुगोळ्याचा स्फोट होऊन आजवर अनेकांनी प्राण गमावले आहेत. असे प्रकार वाढल्यानंतर लष्कराने हे भंगार गोळा करण्याचा ठेका दिला.

काही वर्षांपूर्वी शेळके नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले होते. त्याच्यावर लष्कराचा दारुगोळा चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला. पण नंतर त्याचा गूढ मृत्यू झाल्यामुळे त्या प्रकरणाचा तपास थंडावला. लष्कराने भंगार गोळा करण्याचा ठेका दिल्यानंतर गावात अपघाताच्या घटना कमी झाल्या, असे स्थानिक लोक सांगतात. ठेकेदाराकडे भंगार गोळा करण्यासाठी मोजकेच मनुष्यबळ आहे. त्यामुळे स्थानिक लोक दादागिरीच्या बळावर लष्करी हद्दीत प्रवेश करतात. या पद्धतीने गोळा केलेले भंगार विकत घेणारे अवैध व्यावसायिकही येथे आहेत.
भंगाराची तस्करी कशासाठी ?

लष्करी सरावक्षेत्रात मिळणार्‍या निकामी दारुगोळ्यांमध्ये लोखंड, तांबे, अँल्युमिनिअम, निकेल, शिसे, दारुगोळ्याची पावडर असे किमती पदार्थ सापडतात. या पदार्थांना (विशेषत: दारुगोळ्याच्या पावडरला) काळ्या बाजारात चांगली किंमत मिळते. काही वर्षांपूर्वी शेळके नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले होते. त्याच्याकडे सापडलेल्या पावडरची किंमत कोटींमध्ये असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. भंगारातून मिळणार्‍या लाभापोटी गावातील लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत.
महत्त्वाचा पुरावा मिळाला

गुरुवारी दुपारी नाशिकच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा (फोरेन्सिक लॅब) पथकाने घटनास्थळी भेट दिली. या पथकाने केलेल्या पाहणीत बॉम्बचे ‘केट्रर’ (बॉम्बचे सील, जे उघडल्यानंतर स्फोट होतो) मिळाले. अतिशय महत्त्वाचा पुरावा असलेले हे ‘केट्रर’ मिळाल्याने तपासाला वेग प्राप्त होणार आहे. सहायक रासायनिक विश्लेषक सी. आर. बोडखे, ए. एस. रासेराव, सहायक वैज्ञानिक मनोज पाटील व बापू पाटील यांच्या पथकाने व प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक अश्विनी पाटील यांनी हे महत्त्वाचे पुरावे जमा केले.
सोयरिक ठरवायला अडचण

खारे कर्जुने गावात दारुगोळ्याचे भंगार गोळा करताना अपघात होण्याचे प्रमाण मध्यंतरी प्रचंड वाढले होते. त्यामुळे या गावाबद्दल परिसरात काही समज पसरले. प्रत्येक घरातील माणूस भंगार गोळा करतो, हा त्यापैकीच एक समज. न जाणो घरातील कर्ता पुरुष असे भंगार गोळा करताना दगावला, तर आपल्या मुलीवर विधवा होण्याची वेळ येईल, या भीतीने खारे कर्जुने गावात कोणीही मुली देत नव्हते, असे गावकरी सांगतात. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे.
गडचिरोलीतील ‘तो’ अनुभव कामी आला

4जखमी हौसाबाई तांबे हिच्याविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. स्फोटक पदार्थ असल्याची माहिती असतानाही ते हयगयीने हाताळून अनिलच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात मी काम केलेले आहे. तेथे अशा पद्धतीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तो अनुभव असल्याने तत्काळ न्यायवैद्यक प्रयोगशाळा पथकाला पाचारण केले. त्यामुळे आम्हाला महत्त्वाचे पुरावे मिळाले.’’ चंद्रशेखर सावंत, सहायक पोलिस निरीक्षक.

सोयरिक ठरवायला अडचण
खारे कर्जुने गावात दारुगोळ्याचे भंगार गोळा करताना अपघात होण्याचे प्रमाण मध्यंतरी प्रचंड वाढले होते. त्यामुळे या गावाबद्दल परिसरात काही समज पसरले. प्रत्येक घरातील माणूस भंगार गोळा करतो, हा त्यापैकीच एक समज. न जाणो घरातील कर्ता पुरुष असे भंगार गोळा करताना दगावला, तर आपल्या मुलीवर विधवा होण्याची वेळ येईल, या भीतीने खारे कर्जुने गावात कोणीही मुली देत नव्हते, असे गावकरी सांगतात. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे.