आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shreekshetra Bhagavanagad,latest News In Divya Marathi

भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींवर गुन्हा, आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- श्रीक्षेत्र भगवानगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात राजकीय वक्तव्य करून व देवस्थानच्या जागेचा राजकीय कारणासाठी वापर करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महंत डॉ. नामदेवशास्त्री महाराजांविरुद्ध भरारी पथकप्रमुख देवराम भोईटे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महंताविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. हे वृत्त समजताच भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपच्या वरिष्ठ वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
दसरा मेळाव्यातील परवानगी पत्रातील अटी व शर्तीचे उल्लंघन करून राजकारणासाठी धार्मिक स्थळाचा वापर केला. राजकीय, तसेच केंद्रातील सत्ताधारी पक्षाची कामगिरी स्पष्ट करणारी वक्तव्ये करण्यात आली. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे सकृतदर्शनी दिसते, अशी तक्रार नगरच्या बाबासाहेब कुलकर्णी यांनी निवडणूक अधिका-यांकडे केल्यानंतर संबंधित कार्यक्रमाच्या चित्रफितीची पडताळणी करून गुन्हा नोंदवण्यात आला.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आमदार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भगवानगडावर मेळावा घेण्यात आला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, एकनाथ खडसे, महादेव जानकर, विनायक मेटे, शिवाजी कर्डिले, दिलीप गांधी, राम शिंदे, गोविंद घोळवे यांच्यासह गडाचे महंत डॉ. शास्त्री व अन्य कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.
दरम्यान, महंतांविरोधात चुकीची तक्रार दाखल झाली, असा आरोप करत भगवानगडावर श्रद्धा असणा-या भाविकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या यंत्रणेकडून याबाबत माहिती घेतली असून पुढील दिशा ठरवण्यासाठी रात्री उशिरा कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे अ‍ॅड. दिनकर पालवे यांनी सांगितले.