आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंत्याचा पत्नीसह गुदमरून मृत्यू, श्रीरामपूरमध्ये हॉटेल निलायमला आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - बसस्थानकाजवळच्या निलायम हॉटेलला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सतीश वसंत कुलकर्णी (५५, नाशिक) व त्यांची पत्नी सुमित्रा (५२) यांचा गुदमरून अंत झाला. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरून उड्या टाकल्या. मनसिक डब्ल्यू (३२, थायलंड), अनजित कुमार (३०, बिहार), पांडुरंग शंकर भगत (३७), राहुल मच्छिंद्र जायभाय (३५, इरगाव, ता. कर्जत) अशी जखमींची नावे आहेत. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हॉटेलच्या दक्षिणेकडील भटारखान्यात पहाटे चारच्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याचा संशय अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केला. आग लागल्यानंतर काही तासांत परमिटरूममधील सर्व फर्निचर भस्मसात झाले. कर्मचार्‍यांनी आरडाओरडा करून हॉटेलमध्ये उतरलेल्यांना जागे केले. यावेळी हॉटेलमध्ये सुमारे २५ ग्राहक होते. प्रत्येक जण मिळेल त्या मार्गाने पळाला. बाहेर पडण्याच्या जिन्यामध्ये आग व धुराचा लोळ दिसल्याने अनेकांनी सुमारे २० फुटांवरून उड्या टाकल्या. त्यात चार जण जखमी जखमी झाले. यात एका विदेशी बियाणे कंपनीच्या कॅम्पेनिंगसाठी आलेले मनसिक डब्ल्यू. यांचा समावेश आहे. सतीश कुलकर्णी नाशिक महावितरण कार्यालयात सहायक अभियंता होते. नुकतीच त्यांना बढती मिळाली होती.

गुरुवारी त्यांनी श्रीरामपूर कार्यालयात उपकार्यकारी अभियंता पदाची सूत्रे स्वीकारली. राहण्यासाठी बघितलेला बंगला त्यांना शुक्रवारी मिळणार होता. तात्पुरत्या मुक्कामासाठी ते निलायम हॉटेलमध्ये राहिले. आरडाओरडा ऐकून ते खोलीबाहेर पडले. मात्र, बाहेर आगीचे लोळ व धूर पाहून त्यांना मार्ग सापडला नाही. वय झाले असल्याने त्यांना खाली उडी मारणे शक्य नव्हते. पती-पत्नीने दुसर्‍या खोलीत आसरा घेतला. मात्र, तेथे धुरात गुदमरून त्यांचा अंत झाला. आगीची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव, सहायक निरीक्षक नितीन पगार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सामाजिक कार्यकर्ते, पालिकेचे पदाधिकारी, व नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. राहाता, राहुरी, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे २० बंब आग शमवण्याच्या प्रयत्नांत होते. चार तासांनंतर आग आटोक्यात आली. जखमींना ओगले रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आगीच्या घटनेची जबाबदारी निश्चित झाल्यानंतर यात वाढीव कलम लावण्यात येईल. हॉटेलचे मालक दत्तात्रेय सानप परदेशी गेले आहेत.

मृत्यूचे कारण वीजच ठरले
कुलकर्णी दाम्पत्य वयस्कर असल्याने तरुणांप्रमाणे दुसर्‍या मजल्यावरून उड्या टाकणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे एखाद्या खोलीचा दरवाजा लावून घेतल्यास आपण सुरक्षित राहू असे त्यांना वाटले. हाच निर्णय त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. दरवाजाच्या सापटीतून आलेला धूर व विषारी वायू यामुळे गुदमरून त्यांचा करून अंत झाला. सुमित्रा यांचा मृतदेह बाथरूममध्ये, तर सतीश यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळला. कुलकर्णी हे महावितरणमध्ये असल्याने त्यांचे सर्व आयुष्य विजेशी ‘खेळण्या’त गेले. मात्र, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीनेच त्यांचा जीव घेतला.
बातम्या आणखी आहेत...