आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शुक्राचे अधिक्रमण पाहण्यासाठी चांदबिबी महालावर गर्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर । शुक्राने सूर्याला लावलेले ग्रहण ही दुर्मिळ खगोलिय घटना पाहण्यासाठी हौशी नगरकरांबरोबर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातील खगोल निरीक्षकांनी बुधवारी सकाळी चांदबिबी महालाच्या परिसरात गर्दी केली होती. सुरुवातीचे काही क्षण अधिक्रमण दिसले, पण नंतर ढगांनी सूर्यबिंबापुढे गर्दी केल्याने शुक्राचा पुढचा प्रवास दिसू शकला नाही.
सूर्यादयापासून ते 10 वाजून 22 मिनिटांपर्यंत सूर्याच्या बिंबासमोरून शुक्र जाणार होता. यानंतर थेट 105 वर्षांनी अशा प्रकारचे अधिक्रमण होणार असल्याने या घटनेला विशेष महत्त्व होते. हे दृश्य व्यवस्थित पाहता यावे, म्हणून अनेकजण भल्या पहाटेच शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदबिबी महालावर गोळा झाले होते. सातार्‍याकडे गेले काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने तेथील खगोलप्रेमी खास अधिक्रमणासाठी नगरला आले होते. खगोल अभ्यासक व लेखक मोहन आपटेही आले होते. मुला-मुलींची संख्याही लक्षणीय होती.
सूर्य उगवल्यानंतर सुमारे दोन मिनिटे शुक्राचे अधिक्रमण सुरेख दिसले. अधिक्रमण पाहण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था करण्यात आली होती. काहींनी विशिष्ट प्रकारचे गॉगल व एक्सरे फिल्म आणली होती. सर्वांचा उत्साह वाढत असतानाच आकाशातील ढगात सूर्यबिंब लपले गेले. त्यामुळे नंतर बराच वेळ अधिक्रमण दिसले नाही. न्यू आर्टस् कॉलेज, तसेच भास्कराचार्य अँस्ट्रोनॉमी रिसर्च सेंटरच्या वतीने अधिक्रमण पाहण्यासाठी दुर्बिणीची सोय करण्यात आली होती. तेथेही गर्दी झाली होती.