आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहालयाच्या रूपानं नगरमध्ये जपलं जातंय माणूसपण, अभिनेता सिद्धार्थ जाधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नाटकाच्या निमित्तानं नगरशी ऋणानुबंध जुळले. या क्षेत्रातील अनेक मित्र इथे मिळाले. इथल्या स्नेहालय संस्थेला भेट दिली, तेव्हा माणूसपण म्हणजे काय हे मला उमगलं. एक वेगळं नातं स्नेहालयमुळे जोडलं गेलं...हे सांगत होता प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव.

येत्या २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या "रझाकार' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ नगरला आला आहे. आयएमएस आणि स्नेहालयला भेट दिल्यानंतर त्याने "दिव्य मराठी'च्या कार्यालयात येऊन सर्व सहकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

"रझाकार' चित्रपटातलं कथानक जरी १९४८ मध्ये घडत असलं, तरी आजही हे संदर्भ, प्रवृत्ती बदललेली नाही. सरदार वल्लभभाई पटेलांना पोलादी पुरूष का म्हणतात, त्यांनी रझाकार संपवण्यासाठी कशी ठोस कारवाई केली हा इतिहास आजच्या पिढीला कळायला हवा, त्यांच्यातील जाणिवा जाग्या व्हायला हव्यात, हा उद्देश या चित्रपटामागे आहे, असं सिद्धार्थ म्हणाला.

सांस्कृतिक क्षेत्रात नगरचा मोठा दबदबा आहे. नाटकामुळे नगरशी माझा संबंध आला, पण स्नेहालयासारख्या वंचित, उपेक्षित बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेमुळे नगरशी माझं वेगळं नातं जोडलं गेलं. स्नेहालयला ही माझी दुसरी भेट होती. माणूसपण काय असतं, हे तिथं गेल्यावर समजलं, असं सिद्धार्थ म्हणाला.

सावेडीतील माऊली संकुलातील नव्या थिएटरमुळे नगरच्या सांस्कृतिक विश्वात मोठी भर पडेल. कलावंतांसाठी आणखी एक व्यासपीठ उपलब्ध होईल, असं सांगून सिद्धार्थ म्हणाला, नगरनं मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर यांच्यासारखे मोठे कलावंत दिले आहेत. मिलिंद शिंदे, हरिष दुधाडे ही तरूण पिढी ही परंपरा पुढे नेत आहेत. सतत प्रयत्न करत राहणं हे कोणत्याही कलाकारांसाठी महत्त्वाचं असतं. ठेच लागली म्हणून थांबू नये. पुढच्या पायरीवर यश मिळणार आहे हे लक्षात ठेवावं, असं सिद्धार्थनं सांगितलं.

सिद्धार्थ महाराष्ट्राचा व्यसनमुक्ती चळवळीचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल, आणि स्वत:ला कुटुंबाला आनंदी ठेवायचं असेल, तर व्यसनांपासून दूर राहायला हवं, असं त्यानं सांगितलं. व्यसनमुक्तीचा उपदेश करताना शिक्षक म्हणून करण्यापेक्षा मित्रत्वाच्या भूमिकेतून सांगितलं, ते जास्त प्रभावी ठरतं, असं निरीक्षणही त्यानं नोंदवलं.

कौतुकास्पद उपक्रम
"दिव्यमराठी'ने सुरू केलेल्या "पॉझिटिव्ह न्यूज' या संकल्पनेचं कौतुक सिद्धार्थ जाधव यांनी केले. दिवसाची सुरुवात सकाळी चांगल्या गोष्टीने झाली, तर सकारात्मक विचार दिवसभर मनात राहतात, असे त्याने सांगितले.