आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Avdhoot Gupte,latest News In Divya Marathi

अवधूतच्या गाण्यावर थिरकली तरुणाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "सत्यजित आला रे!' या गाण्याच्या लाँचिंगसाठी गायक अवधूत गुप्ते गुरुवारी नगरमध्ये आले होते. सकाळी अकराच्या सुमारास न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर हा कार्यक्रम झाला. अवधूत व सत्यजित वाहनातून उतरताच तरुणाईने "सत्यजित आला रे!' या गीतावर ठेका धरला.
युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी हृतिक जोशी, पक्षाचे निरीक्षक दीप चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अवधूत यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली.विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गाण्यांना तरुणाईने डोक्यावर घेतले. यावेळी जोशी म्हणाले, नगरचा विकास झालेला नाही. राज्याच्या अनेक विकास योजना नगरमध्ये आलेल्या नाहीत. तांबे नगरच्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेसचे निरीक्षक चव्हाण म्हणाले, तांबे यांच्या रुपाने काँग्रेसने चांगला उमेदवार दिला आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी सत्यजितला निवडून द्या. यावेळी धनंजय जाधव, गौरव ढोणे, निखिल वारे, बाळासाहेब भुजबळ, मुन्नाशेठ चमडीवाले, अभिजित लुणिया, बाळासाहेब पवार, अजय औसरकर, सविता मोरे आदी उपस्थित होते.

दरम्यान, तांबे यांचा नगर शहरातील प्रचाराचा झंझावात वाढतोच आहे. शहर, तसेच उपनगरांमध्ये फिरून ते नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. यानिमित्ताने ते नगर शहरातील नागरी प्रश्नांची जवळून ओळख करून घेत आहेत. काँग्रेसचे मोठे स्टार प्रचारक अजून नगरमध्ये आले नसले, तरी ती उणीव सत्यजित तांबे यांनी व्यक्तिगत गाठीभेटीतून भरून काढण्याचा आटोकाट प्रयत्न चालवला आहे.

नगरची तळमळ!
नगर शहर काय आहे, येथील नेमके प्रश्न कोणते आहेत? या शहरासाठी आणखी काय काय करता येईल, याची सर्व माहिती सत्यजित तांबे मला देत असताना त्यांची नगरबद्दलची तळमळ, जिद्द आणि विकास करण्याची मानसिकता मला दिसली. सत्यजित आला रे हे गाणं करताना हा अनुभव मला आला. त्यामुळेच आपण त्यांच्या प्रचारासाठी नगरला आलो आहोत, असे अवधूत गुप्ते यांनी सांगितले.

नगरची प्रतिमा बदलणार
मोठे खेडे ही नगरची प्रतिमा बदलण्यासाठी, शहराचा विकास करण्यासाठी विकासाचा आराखडा घेऊनच निवडणुकीत उतरलो आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रोजगार, रस्ते, या समस्या सोडवण्यावर भर देणार आहे. आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराने आपण निवडून आल्यानंतर काय करणार आहोत, याचे प्रतिज्ञापत्र दिलेले नाही. मी मात्र दिले आहे, असे तांबे म्हणाले.