नगर- जुन्या काळातील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम सध्या हलाखीत जीवन कंठत आहेत. ८० वर्षांच्या या गायिकेला पैशांअभावी वैद्यकीय उपचार घेता येत नाहीत, हे समजताच नगरमधील रिक्षाचालक अशोक औटी हॉटेलमध्ये काम करणारे वेटर दिलीप अहिरे यांनी एक हजार रूपयांची मदत देऊ केली. ही अन्य काही जणांनी देऊन केलेली मदत मुबारक बेगम यांचे चाहते सुहास मुळे त्यांना नेऊन देणार आहेत.
मुबारक बेगम यांनी हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. वृद्धापकाळात या गायिकेवर "दिवारे क्या गिर गयी मेरे कच्चे मकान की, लोगो ने मेरे कमरेसे रस्ते बना दिए...' असं म्हणत विपन्नावस्थेत दिवस काढण्याची वेळ आली आहे. आजारी असलेल्या मुबारक बेगम यांच्याकडे औषधे घेण्यासाठीही पैसे नाहीत, हे समजताच सुहास मुळे, रामभाऊ शिंदे, कैलास दळवी या संगीतप्रेमींनी ताबडतोब व्हॉटस् अॅपवर मदतीचे आवाहन केले. सांस्कृतिक, संगीत क्षेत्रातील व्यक्तींबरोबर राजकीय नेते, नगरसेवक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा होती, पण त्यांनी आवाहनाकडे दुर्लक्ष केले.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे अशोक औटी या रिक्षाचालकाने वेटर म्हणून काम करणारे दिलीप अहिरे यांनी मात्र स्वत:च्या कष्टाची कमाईतून एक हजार रूपये या महान गायिकेसाठी देऊ केले. येथून पुढे महिनाभर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या टिपची रक्कम जमा करून पाठवेन, असेही त्यांनी सांगितले. दीनदयाळ पतसंस्थेचे वसंत लोढा यांनी २१०० रूपयांचा धनादेश दिला. स्वत: मुळे यांनी पाच हजार रूपये देऊ केले आहेत. ही मदत ते मुबारक बेगम यांना जोगेश्वरी येथे नेऊन देणार आहेत. जोगेश्वरी येथे ४७० फुटांचा फ्लॅट मुबारक बेगम यांनी मिळवून देण्यासाठी मुळे यांनीच मदत केली होती.
मदत करू इच्छिणाऱ्यांनी मुबारक बेगम, स्टेट बँक ऑफ इंडिया, जोगेश्वरी पश्चिम शाखा, अकाउंट नंबर - १०२७९२५२५९८, आयएफसी कोड - एसबीआयएन - ०००४६२६, एमआयसीआर कोड - ४०००२०३८ यावर रक्कम पाठवावी, असे आवाहन मुळे यांनी केले आहे.
संगीताचे कार्यक्रम करणारे मदतीत मागे...
प्रायोजकांच्या जीवावर संगीताचे भपकेबाज कार्यक्रम शहरात आयोजित करून तीन तासांत लाखो रूपयांची उधळपट्टी करणाऱ्या मंडळींकडून थोर गायिका मुबारक बेगम यांच्यासाठी एक रूपयाही अजून मदत मिळाली नसल्याची खंत संगीत रसिक सुहास मुळे यांनी व्यक्त केली.