आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singer Uttara Kelkar Awarded By Swarrustam Award In Nagar

‘स्वररुस्तुम पुरस्कार’ उमेद व जबाबदारी वाढवणारा..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संगीत क्षेत्रात आयुष्यभर कार्य करणारे व सर्वसामान्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे रुस्तुमकाका हाथीदारो हे खरे कलाकार होते. जेवढे कार्य त्यांनी कलेसाठी केले तेवढेच समाजसेवेसाठी केले. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार उमेद व जबाबदारी वाढवणारा आहे. माणिक हाथीदारोयांनीही मोठय़ा बंधूप्रमाणे मार्गदर्शन केले. त्यांचेही नाव संगीत क्षेत्रात नावाजलेले आहे, असे ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर यांनी सांगितले.

प्रतिबालगंधर्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ गंधर्वगायक व संगीतकार कै. रुस्तुमकाका हाथीदारो यांच्या 31 व्या स्मृतिदिनानिमित्त स्वररुस्तुम कला विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘स्वररुस्तुम पुरस्कार 2013’ प्रदान समारंभ सहकार सभागृहात नुकताच पार पडला. शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनिरुद्ध आडसूळ यांना, तर संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्तरा केळकर यांना माणकेशा रुस्तुम हाथीदारो यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 25 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. प्रसन्ना जोशी, उपाध्यक्ष प्रकाश सावंत, निमंत्रक ताराचंद बोरा, सचिव संजय पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

माणेकशा हाथीदारो म्हणाले, प्रतिबालगंधर्व म्हणून ख्याती पावलेले माझे वडील रुस्तुम हाथीदारो यांना अवतार मेहेरबाबांचा आशीर्वाद मिळाला होता. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत नाथबुवा दीक्षित यांच्याकडून प्राथमिक संगीत शिक्षणाचे धडे घेतले. नगरमध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी पुण्या-मुंबईत जाऊन कार्यक्रम केले. प्र. के. अत्रे यांनी त्यांना ‘प्रतिबालगंधर्व’ ही उपाधी बहाल केली.

आडसूळ म्हणाले, रुस्तुमकाकांनी आयुष्यभर संघर्ष करून संगीताची सेवा केली. समाजासाठीही त्यांनी महान कार्य केले. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार प्रेरणा देणारा आहे. शिक्षण क्षेत्रात काम करताना साकेश्वर ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले. पुरस्काराच्या रूपाने मिळालेली 25 हजारांची रक्कम उत्तराखंडच्या आपद्ग्रस्तांसाठी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

प्रास्ताविक अँड. जोशी यांनी केले. रुस्तुमकाकांचे कार्य नगरकरांच्या स्मरणात रहावे, यासाठी प्रतिष्ठानची स्थापना करून ‘स्वररुस्तुम पुरस्कार’ सुरू केले, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विराज मुनोत यांनी केले, तर आभार श्रीपाद भोंग यांनी मानले. पुरस्कार वितरण कार्यक्रम झाल्यानंतर गायिका उत्तरा केळकर यांच्या बहारदार गाण्यांची मैफल रंगली. त्यांनी सादर केलेल्या सदाबहार मराठी गीतांना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.