आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीगोंद्यात सहा उमेदवारांची मोर्चेबांधणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अर्धा डझनपेक्षा अधिक इच्छुकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. त्यामुळे निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व शेतकरी संघटना या प्रमुख पक्षांसह काही बंडखोर रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी सर्वांत आधी मोर्चेबांधणी सुरू केली. प्रत्येक निवडणुकीच्या किमान एक वर्ष आधी ते तयारी सुरू करतात. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी स्वबळावर रिंगणात उतरले, तर काँग्रेसकडून सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा यांचे एकमेव नाव चर्चेत आहे. नागवडेंनी सुमारे दोन वर्षांपासून तयारी चालवली आहे. नागवडे-पाचपुते या जुन्या राजकीय लढाईत आता नागवडेंच्या सूनबार्इंची भर पडण्याची चिन्हे आहेत.

ज्येष्ठ नेते कुंडलिकराव जगताप यांना अनेकदा शेवटच्या टप्प्यात थांबावे लागल्याची खंत त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवतात. यंदा त्यांचे पुत्र व कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी काहीही होवो, विधानसभा लढवायची, असा निर्धार करत तयारी सुरू केली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून ते वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. जर उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राहुल यांचा सामना आमदार पाचपुतेंशी चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीने विधान परिषदेवर वर्णी न लावल्याने नाराज होत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे शेलार यांनीही विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. ते दुसर्‍यांदा विधानसभेसाठी पाचपुतेंशी टक्कर देण्यास सज्ज झाले आहेत.

पडद्यामागून सूत्रे हलवणारे बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनाही आमदार होण्याच्या ध्येयाने पछाडले आहे. किंगमेकर म्हणून वावरणारे नाहाटा आता ‘किंग’ बनण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ‘आप’ या पक्षांच्या ते संपर्कात आहेत. नगर तालुक्यातील बाळासाहेब हराळ यांचेही नाव चर्चेत आहे. नगर तालुक्यातील दोन गट श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात असल्याने हराळ यांच्या आशा पूर्वीपासून पल्लवीत झाल्या आहेत. काँग्रेस किंवा अपक्ष म्हणून ते मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत.

गाडे रिंगणात उतरणार
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेने पहिल्यांदा श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघावर दावा सांगून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शशिकांत गाडे यांनी नगर तालुक्यातील दोन गटांच्या बळावर, तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक पाठिंब्यावर श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. श्रीगोंद्याच्या राजकारणात प्रथमच गाडे यांचे या निमित्ताने पदार्पण होत आहे.